मुबंईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौरा करून आलेत. तसेच आता १ ते ९ मार्च दरम्यान राज ठाकरे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत श्रीराम प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. तर ९ मार्चनंतर राज ठाकरे राज्यभर दौरा करणार आहेत. आज पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वी मनसेने आपला झेंडा बदलून, तो भगव्या रंगाचा केला होता. मनसेने हिंदुत्त्वाची कास धरत पक्षाच्या झेंड्यातील बदल आणि मनसेची मराठीच्या मुद्द्यासह हिंदुत्त्वाची स्वीकारलेली भूमिका यामुळे राज ठाकरे अयोध्या वारी करणार का असा प्रश्न वारंवार विचारण्यात येत आहे. या प्रश्नांची उत्तर देण्याची तयारी पक्षाने सुरु केल्याचे चित्र आहे. बाळा नांदगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे १ ते ९ मार्च दरम्यान अयोध्येचा दौरा करणार आहेत.