विजय कुलकर्णी/परभणी : गाव स्वच्छ, सुंदर, हागणदारी मुक्त आणि प्लास्टिक मुक्त होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने 'माझा गाव सुंदर गाव' या अभियानामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे.
गुरुवार तालुक्यातील आर्वी ग्रामपंचायतमध्ये 'माझा गाव सुंदर गाव' अभियानांतर्गत शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता गंगाधर यंबडवार, गट विकास अधिकारी अनुप पाटील, विस्तार अधिकारी स्वप्निल पवार शैलेंद्र पानपाटील, जी. एम. गोरे, ग्रामसेवक संजय शिंदे, प्रशासक नारायण कुटवाड आदींची उपस्थिती होती.
यावेळी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात केला. तसेच वृक्ष लागवड मोहिमेत पुढाकार घेतलेल्या युवकांचा व नवनिर्वाचित ग्रा.पं.सदस्यांचा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते करण्यात आला. नागरिकांशी संवाद साधताना टाकसाळे म्हणाले, गावातील युवक व नागरिकांनी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यावर लक्ष देऊन गावातील गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे. तसेच पशु प्राण्यांचा विचार करून त्यांना चारापाणी घालण्यासाठी योगदान द्यावे, उघड्यावर शौचास न जाता शौचालयाचा नियमित वापर करणे तसेच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे व प्लास्टिक मुक्तीची मोहिम राबविणे, शिक्षणाला प्राधान्य देणे अशा विविध विषयावर टाकसाळे यांनी मार्गदर्शन केले आणि गावक-यांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन ही दिले. यावेळी राजेंद्र तूबाकले, ओमप्रकाश यादव, विजय मुळीक यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायकवाड तर प्रास्ताविक माऊली कदम यांनी केले.