माधव पिटले/निलंगा:कालच अमरावती वरून निलंग्यात आलेल्या एका व्यापाऱ्यांची अज्ञात चोरट्याने 80 हजार रुपये रक्कम असलेली बॅग घेऊन पळ काढला होता. आणि आता एका पिग्मी एजन्टला चाकुचा धाक दाखवून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात वाढत्या चोरीच्या घटनामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील कुणबी नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या पिग्मी एजंटाला निलंगा शहराकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून पन्नास हजार रूपयाला लुटल्याचा प्रकार शुक्रवारी दि. 29 रोजी रात्रीच्या सुमारास घडला. याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात शनिवारी दि.30 रोजी अज्ञात तीन आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निलंगा शहरातील कुणबी नागरी बिगर सहकारी पतसंस्थेचे पिग्मी एजंट ईश्वर राजकांत कोळ्ळे हे शहरापासून अवघ्या चार- पाच किलोमीटर असलेल्या पालापूर ता. निलंगा येथून पिग्मी धारकांचे पैसे घेऊन निलंगा शहराकडे रात्री नऊच्या सुमारास निघाले होते. स्वतःची गाडी क्रमांक एम.एच. 24 बि.ए. 5750 या शाईन गाडीवर येत असताना पाठीमागून तीन अज्ञात व्यक्ती विना नंबरच्या पल्सर गाडीवर आले. व चाकूचा धाक दाखवत गाडी आडवी लावून पिग्मी एजन्ट कडून गोळा करून बॅगमध्ये 41 हजार 220 रूपये रोख रक्कम ठेवले होते. ती बॅग हिसकावून घेऊन त्यांच्या जवळील पाच हजार रूपयाचा मोबाईल असा एकूण 51 हजार 220 रूपयाचा मालाची जबरी चोरी करत तिघेही पसार झाले.
याबाबत ईश्वर राजकांत कोळ्ळे रा. चिंचोली-भंगार यांनी निलंगा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ढोणे करीत आहेत.
दरम्यान कालच अमरावती येथील एका व्यापाऱ्याची अज्ञात चोरट्यांनी 80 हजार रुपयाची बॅग घेऊन पसार झाले होते. त्यातच रात्री सव्वा नऊच्या सुमारास एका पिग्मी एजंट आला चाकूचा धाक दाखवून पन्नास हजार रुपयाला लुटल्याचा प्रकार घडल्यामुळे निलंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून शहरासह ग्रामीण भागातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.