विजय कुलकर्णी/परभणीः बुधवारी पहाटे एका विद्यार्थ्यास लुटण्याच्या घटनेनंतर त्याच दिवशी रात्री दहाच्या सुमारास तिघांनी मारहाण करित दोघांना लुटल्याची घटना पुन्हा घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप मुंजाजी गीते हे अन्य एका व्यक्तीसोबत दि.२० रोजी रात्री जेवणाचा डबा घेऊन एम.एच.३० बी. ७२०६ क्रमांकाच्या जीपमधुन गंगाखेड नाका येथील रेल्वे गेट जवळून जिंतूर रोडकडे उड्डाण पुलाखालून जात होते. त्यावेळी तीन व्यक्तींनी त्यांना अडवत लाथा बुक्यानी मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या या हल्याने गीते व सोबतची व्यक्ति प्रचंड घाबरले. मारहाण करणाऱ्यांनी खिशातील साडेतीन हज़ार रुपये रोख व मोबाईल बळजबरीने काढून घेऊन लाल रंगाच्या मोटार सायकलवर बसून पळून गेले.
त्यांनी तेथील अन्य नागरिकांच्या मदतीने पोलिसांना ही माहिती दिली. घटनेची माहिती समजताच स.पो.नि विवेकानंद पाटील, पो.नि, स.पो.नि व्ही. एस. आरसेवार हे कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संदीप गीते यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत साडेतीन हज़ार रुपये रोख व मोबाइल मारहाण करून तीन अज्ञात व्यक्तींनी लुटल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी स.पो.नि विशाल बहात्तरे अधिक तपास करित आहेत.