विजय कुलकर्णी/परभणीः राज्यातील सर्व शाळांमधून इयत्ता ५ ते ८ वीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने दि.१८ रोजी दुपारी एका परिपत्रकाद्वारे काढले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता ९ ते १२ वर्ग २३ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आले होते. हे वर्ग सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर टप्पाटप्प्याने या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली.कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये, त्याचा मानसिक परिणाम विद्यार्थी व पालकांवर होवू नये म्हणून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला सार्वजनिक आरोग्य विभागाने सहमती दर्शवली असून त्याप्रमाणे २७ जानेवारी पासून सर्व शाळांमध्ये इयत्ता ५ ते ८ वर्ग सुरू करावेत, असे आदेश या खात्याचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी बजावले आहेत.
१५ जून, २९ ऑक्टोबर व ३० नोव्हेंबरच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी शाळा व वर्ग सुरळीत होण्यासंदर्भात सर्वतोपरी खबरदारी बाळगावी, असे आवाहन केले आहे.