विजय कुलकर्णी/परभणीः दि.२१ रोजी रात्री संजय गांधी नगरात देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतूस जप्त करीत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी एकास ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना परभणीतील संजय गांधी नगरात विनापरवाना बेकायदेशीरपणे देशीबनावटीचे पिस्टल एक व्यक्ती बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी याबाबत माहिती दिली असता. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आलेवार यांनी
फौजदार साईनाथ पुयड, कर्मचारी हनुमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसूंदरे, हरिचंद खुपसे, शेख अजर, मोबीन शेख, चव्हाण, गणेश कौटकर, संजय घुगे, कष्णा शिंदे आदींच्या पथकासह संजय गांधी नगरातील एका घरात किरायाने राहणार्या शेख बबलू शेख हसन यास ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्टल आढळले. त्याचबरोबर दोन जिवंत काडतूस सापडले. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांनी त्यास ताब्यात घेत त्याच्याकडून बंदूकीसह दोन जिवंत काडतूस जप्त केले. बंदुकीसह दोन्ही काडतूस असा ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात कर्मचारी हनुमंत जक्केवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल बहात्तरे हे करीत आहेत.