विजय कुलकर्णी/ परभणी : पूर्णा शहरातील शासकीय दवाखान्याच्या समोर एक ट्रक बेकायदेशीर वाळू भरून घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी ट्रकचालकाची चौकशी केली असता त्यावेळी अवैध उपसा केलेली वाळू ट्रकमध्ये आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून ट्रकसह वाळू जप्त केला आहे.
मागील काही दिवसांपासुन पुर्णा तहसीलदारांनी दुर्लक्ष केल्यामुळे पूर्णा नदीच्या काठावर रात्री-बेरात्री व दिवसा मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन, उपसा सुरू आहे. आज सकाळी पूर्णा शहरातील झिरो फाटारोड वरून गजबजलेल्या वस्तीत शासकीय दवाखान्याच्या समोर एक ट्रक सहाय्यक पोलीस निरीक्षक भागोजी चोरमले यांना अवैध वाळू घेऊन येत असल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती स्थानिक पोलिस सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी झिरो फाटा येथून रेती घेऊन आलेला (ट्रक क्रमांक एम.एच. ३४-२९१६) याला हटकले असता या ट्रकमध्ये २ ब्रास अवैद्य उपसलेली वाळू आढळून आली. याप्रकरणी यातील आरोपी बाबा मिया सय्यद उस्मान व दिगंबर धोंडीबा लोमटे (रा. लक्ष्मणनगर) या दोघांविरुद्ध पूर्णा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या ताब्यातील ४ लाख रुपये किमतीचा ट्रक व ८ हजार रुपये किमतीची अवैध वाळू जप्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भागोजी चोरमले व त्यांचे सर्व सहकारी करीत आहेत.