पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्य शिवनेरी किल्ल्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. सोहळ्याला उपस्थित असलेल्या निवडक शिवप्रेमींना संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक भाषा अवगत होत्या. त्यात 'इंगित विद्याशास्त्र' ही एक भाषा होती. या भाषेमुळे एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललेय हे ओळखता येते. आता ती भाषा मी शिकणार आहे. अजितदादांच्या मनात काय चाललंय हे ओळखता आले पाहिजे. त्यासाठी मी ही भाषा शिकणार आहे. मग त्यांनी अगदी गॉगल घातला, मास्क लावला तरी त्यांच्या मनातले ओळखणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आज साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षाने सडकून टीका करत आहेत. यावेळी अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देत विरोधकांचा समाचार घेतला आहे. रयतेच्या जीवाला धोका निर्माण होईल, असा कोणताही निर्णय महाराजांनी घेतला नाही .महाराजांच्या जीवनातील कोणताही प्रसंग घ्या, महाराजांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा आपण अभ्यास करा. त्यांनी घेतलेले निर्णय हे स्वराज्याचे हित आणि जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेवूनच घेतलेला होता हे लक्षात येईल, असे यावेळी अजित पवार म्हणाले.