विजय कुलकर्णी / परभणी : पूर्णा तालुक्यात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसुन येते. जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचा बिमोड करण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने पुर्णा तालुक्यातील कौडगाव शिवारात १ फेब्रुवारी रोजी सकाळी छापेमारी करीत एक टिप्पर जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात कार्यवाही करण्यासाठी पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शानाखाली पोउपनि चंद्रकांत पवार , विश्वास खोले, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, राहूल चिंचाने, शंकर गायकवाड़, जमीर फरुकी, अजहर पटेल, विष्णु भिसे, दीपक मुदिराज, चालक अरूण कांबळे हे सोमवारी पहाटे शिवारात दाखल झाले.
हे पथक व पुर्णा पोलिस ठाण्याचे पोना.काकडे, पोना.शिंदे हे मिळुन अवैध धंद्याची माहिती काढत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पिवळ्या पांढऱ्या रंगाचे टिप्पर मधुन पुर्णा नदी पात्रातुन रेतीची चोरी करुन कौडगाव कडुन लक्ष्मीनगरकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील पोलिस कौडगांव गावात जाणाऱ्या टी पाइंट रोडवर दोन पंचांना सोबत घेऊन थांबले. सकाळी ७ च्या सुमारास एम. एच. ४३ यु. ४२९० क्रमांकाच्या टिप्परची पाहणी केली असता त्यात अडीच ब्रास रेती सापडली. टिप्पर चालकाने त्याचे नाव संदीप चंद्रकांत गायकवाड वय २० वर्षे रा.लक्ष्मीनगर पुर्णा असे सांगितले. कौडगाव शिवारातुन पुर्णा नदी पात्रातुन रेती भरून विक्री करीता घेवुन जात असल्याची माहिती दिली.
त्यानुसार ६ लाख रुपये किंमतीचे टिप्पर, १५ हजार रुपये किंमतीची अडीच ब्रास वाळु असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस कर्मचारी पांडुरंग शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी संदीप चंद्रकांत गायकवाड वय २० वर्षे रा. लक्ष्मीनगर व टिप्पर मालकावर गुन्हा दाखल करण्यात झाला असून पुढील तपास काकडे हे करीत आहेत.