विजय कुलकर्णी /परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व पक्षीयांची उपस्थिती होती.
मागील काही दिवसांपासून महाविद्यायाच्या संदर्भात संघर्ष समितीच्या वतीने मंत्री मंडळातील काही नेत्यांना भेटून निवेदन देण्यात आली होती. त्यानंतर उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे परभणीकरांमध्ये याचा रोष दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर संघर्ष समितीच्या वतीने आज सकाळी धरणे आंदोलन देण्यात आले. या आंदोलनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळेपर्यंत संघर्ष करण्याची तयारी दर्शविण्यात आली. यानंतर या धरणे आंदोलनाला पालकमंत्री नवाब मलिक यांनी भेट दिली.
दरम्यान मलिक यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता दिली जाईल, असे आश्वासन देत मंत्री मंडळातून परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला लवकरच मंजुरी देऊ, असे आश्वासनही पालकमंत्री मलिक यांनी दिले.
यावेळी संघर्ष समितीचे माजी आ. विजय गव्हाणे, खा. फौजिया खान, माजी खा. गणेशराव दुधगावकर, सुरेश जाधव, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, माजी महापौर प्रताप देशमुख, रविराज देशमुख, अॅड. स्वराजसिंह परिहार, माजी आमदार विजय भांबळे, तहसीन अहेमद खान, आलमगीर खान, मुंजाजीराव गोरे, मंगेश सोनवणे, रविचंद्र काळे, राम जाधव, राजेश्वर शिंदे, गंगाधर राऊत, रामेश्वर शिंदे, भीमराव वायवळ, प्रभाकर जयस्वाल, बाळासाहेब रसाळ यांच्यासह शेकडो परभणीकर यावेळी उपस्थित होते.