लातूर: लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाने ३८३ ग्राम पंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाययोजनेअंतर्गत मतदान व मोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडण्याकरीता तालुका दंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या ७४ समाजकंटकांना तात्पुरत्या स्वरूपात आपल्या गावात प्रवेशावर प्रतिबंध (तात्पुरती तडीपारी) घातला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली.
जिल्ह्यातील १३४९ केंद्रावर सुरळीत मतदान सुरू आहे. मतदान कालावधीत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी जिल्ह्याबाहेरून २ उपअधीक्षक, १५ पोलीस निरीक्षक, ५ सहायक व उपनिरीक्षक, १३८ अंमलदार तसेच राज्य राखीव दलाची एक कंपनी तैनात करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील ९ उपअधीक्षक, २३ पोलीस निरीक्षक, ६० सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांसह पोलीस व गृहरक्षक दलाचे एकूण २४०० पेक्षा अधिक कर्मचारी बंदोबस्त कामी तैनात आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली...