विजय कुलकर्णी/ परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह टेक्सटाईल पार्कसाठीच्या जागांचा अहवाल राज्य शासनास तातडीने सादर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
दरम्यान, शुक्रवार दि. ५ रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीस अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर संबंधित अधिका-यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागांची प्रत्यक्ष पाहणी केली.
परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होऊ लागले आहेत. खा. संजय जाधव, खा. फौजिया खान, मा. आ. विजय गव्हाणे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी मुंबईत शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री तसेच मुख्य सचिवांची भेट घेऊन परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास तातडीने मंजुरी देऊन आवश्यक बाबींची पुर्तता करावी अशी मागणी केली.
टेक्सटाईल पार्कसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेची पाहणी करून योग्य तो अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना राज्य शासनाने जिल्हाधिका-यांना दिल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी मराठवाडा विकास महामंडळाचे संचालक काशिनाथ डेकोटे, औद्योगीक विकास महामंडळाचे नांदेड येथील अधिकारी, तहसीलदार डॉ. संजय बिरादार, भूमी अभिलेख तालुका निरीक्षक डी.आर. सोनवणे यांच्यासह परभणीकर संघर्ष समितीचे मा. आ. अॅड. विजय गव्हाणे, मा. खा. अॅड. तुकाराम रेंगे पाटील, सरचिटणीस रामेश्वर शिंदे, विश्वांभर गावंडे, कीर्तीकुमार बुरांडे, अजय गव्हाणे, रवी कांबळे आदींची उपस्थिती होती. या सर्वांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी परभणी शहराजवळील, ब्रम्हपुरी तर्फे लोहगाव तसेच ब्राम्हणगाव येथील जागांची पाहणी केली.
टेक्सटाईल पार्कसाठी ब्रम्हपुरी, रायपूर, ब्राह्मणगाव या जागांची पाहणी केली होती. या जागा विचाराधीन होत्या. मात्र, टेक्सटाईल पार्कसाठी त्या जागांऐवजी परभणी तालुक्यातीलच बाभळगाव येथील जागेचीही पाहणी करण्यात आली आहे.