विजय कुलकर्णी/परभणीःजिंतूर तालुक्यातील चारठाणा शिवारात रस्त्याच्या बाजूला दुचाकीसह कुजलेल्या अवस्थेत गुरुवारी सकाळी सापडलेला मृतदेह हा येलदरीतील २७ वर्षीय युवकाचा असल्याची माहिती चारठाणा पोलिसांनी दिली.
चारठाणा येथून तीन किलोमीटर अंतरावर सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने तेथून जाणार्या महिलांनी त्याचा शोध घेतला. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात दुचाकी क्र. एम.एच. २० बी.ए. २७९० व कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. महिलांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. चारठाणा पोलीस ठाण्याचे सपोनि बळवंत जमादार, फौजदार प्रदीप कोल्हापूरकर यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. अधिक चौकशी केली असता मयत तरुणाची ओळख पटली. तो जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील रहिवासी असुन त्याचे नाव संघपाल भगवान वाकळे असल्याचे स्पष्ट झाले. तो १४ जानेवारी रोजी मतदानासाठी गावाकडे येत होता. पण तो येलदरीला पोहोचलाच नसल्याने नातेवाईकांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. परंतु तब्बल ७ दिवसानंतर चाराठाणा शिवारात कुजलेल्या अवस्थेत त्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. तरुणाचा अपघातात मृत्यू झाला किंवा काही घातपात झाला याविषयी शंका-कुशंका व्यक्त होत आहेत.