माधव पिटले/ निलंगा : महाआघाडी सरकारच्या काळात गोरगरीब ,निराधार,अपंग,विधवा,यांना देण्यासाठीही शासनाकडे पैसे नाहीत. हे सरकार गोरगरिबांची, निराधारांची हेळसांड करत आहे. असा अरोप करत लेखी निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे.
निलंगा तालुक्यातील संजय गांधी स्वावलंबन, निराधार, श्रावणबाळ योजना अंतर्गत लाभार्थींना अनेक महिन्यांपासून पगार नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. काही लाभार्थ्यांना मिळालेलं अनुदान अतिशय तुटपुंज्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांना अनेक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक विवंचना निर्माण झाल्याने जीवन जगणे असह्य वाटत असल्याने आज प्रातिनीधीक स्वरूपात या शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लेखी निवेदन नायब तहसीलदार नितीन महापुरे निलंगा यांना देण्यात आले व तात्काळ सर्व लाभार्थ्यांना थकित अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी, योजनेचे लाभार्थी, भाजपचे लातूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष शेषराव मंमाळे, प.स.माजी सदस्य रजाक रकसाळे, सुधाकर पाटील औरादचे भाजपचे माजी शहराध्यक्ष मुळे यांच्यासह अनेक निराधार लाभार्थी महिला पुरूष उपस्थित होते.
राज्य सरकार स्थापन होऊन वर्षे उलटले तरी अजूनही जिल्ह्यातील व तालुक्यातील निराधार कमिटी निर्माण झाली नाही, अनेक निराधार लोकांनी तहसिल कार्यालयात आपले अर्ज दाखल केले आहेत, परंतु कमिटीच स्थापन केल्याने निराधारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
दोन महिन्याखाली निलंगा येथील एका खाजगी कार्यक्रमात लातूरचे पालकमंञी अमित देशमुख यानी पंधरा दिवसात कमिट्या स्थापन करू असा शब्द दिला होता परंतु अद्याप त्याची अमलबजावणी झाली नाही म्हणजेच हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताचे नाही अशी चर्चा लोक करत आहेत.