परभणी : जिल्ह्यातील खेडीपाडी स्वच्छ व सुंदर व्हावीत म्हणून जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी बुधवार आज सरपंचांशी संवाद साधला.
परभणी पंचायत समिती च्या वतीने 'आमचा गाव आमचा विकास' कार्यक्रमांतर्गत गाव विकास आराखडा संबंधीच्या तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टाकसाळे म्हणाले की, ग्रामीण भागातील जलस्रोतांचे बळकटीकरण करून प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत,सरपंच मंडळींनी शासन निर्णयाचा अभ्यास करून गावाचा विकास साधावा तसेच शेतशिवारा बरोबर गावाचा शिवार देखील स्वच्छ व सुंदर कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत. गावामध्ये शेतीविषयक विविध योजनाची आखणी करावी. त्याचबरोबर गावाच्या सन्मानासाठी प्रत्येकाने शौचालयाचा नियमित वापर कसा होईल यासाठी सरपंच मंडळींनी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले, कार्यकारी अभियंता गंगाधर यंबडवार, गट विकास अधिकारी अनुप पाटील, विस्ताराधिकारी स्वप्निल पवार, शैलेंद्र पानपाटील, जी. एम. गोरे यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक आणि सरपंच उपस्थित होते.