विजय कुलकर्णी/ परभणी : एका खासगी फायनान्सच्या कर्मचा-यास अज्ञात दोघांनी मारहाण करीत त्याच्याजवळील ५० ते ६० हजार रुपयांची रक्कम लुटल्याची घटना आज सकाळी अकराच्या सुमारास पालम तालुक्यातील सिरपूर-केरवाडी रस्त्यावर घडली. भर दिवसा रस्त्यावर झालेल्या या लुटीने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेत अजय चंदु नगुडवार गंभीर जखमी झाला असून त्यास पालम ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. आज सकाळी एका खाजगी फायनान्सचा कर्मचारी अजय चंदू नगूडवार (वय २२) हा ए.पी.१५ बी.के. ४८०२ या क्रमांकाच्या मोटारसायकलवरुन पालम तालुक्यातील सायाळाहून सिरपूरकडे येत होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास अज्ञात दोघा जणांनी त्याला अडवले व लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करीत त्याच्याजवळील ५० ते ६० हजार रुपये घेऊन तेथून पोबारा केला. गंभीर जखमी झालेल्या त्या कर्मचा-यास तेथून जाणा-या ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालय पालम येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु त्याच्या डोक्याला जबर मार असल्यामुळे पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.
ग्रामीण फायनान्सचा तो कर्मचारी असून त्याच्याजवळील ५० ते ६० हजार रुपये लूटले असल्याचे समजते. याबाबत पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती. या घटनेमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.