लाँड्री विभाग पुन्हा आगीच्या भक्ष्यस्थानी

दोन दिवसात दुसरी घटना, शासकीय रुग्णालयात खळबळ

लाँड्री विभाग पुन्हा आगीच्या भक्ष्यस्थानी

विजय कुलकर्णी/परभणी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील लाँड्री विभागास (धोबीघाट) काल सायंकाळी ४.३० ते ५ वाजेदरम्यान आग लागल्याने रुग्णांसह परिसरातील नागरिकांत मोठ्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शनिवारी सांयकाळी शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागास आग लागून मोठे नुकसान झाले होते. याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी समितीही गठीत केली होती. त्यानंतर आज पून्हा लगेचच शासकीय रुग्णालयातील लाँड्री विभाग आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपघात विभागाच्या वरील मजल्यावर ठेवलेल्या साहित्यास शनिवारी रात्री मोठी आग लागली होती. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. तात्काळ अपघात विभागातील रुग्णांना बाहेर काढण्यात आले होते. रात्रीच्या घटनेस अद्याप २४ तासही उलटले नाही तोच काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शासकीय रुग्णालयातील लाँड्री विभागास मोठी आग लागील. या आगीत तेथील काही साहित्य जळून खाक झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आग लागल्याचे लक्षात येताच तेथील कर्मचा-यांसह नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचबरोबर अग्निशमन दलास या घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे दीपक कानोडे, सर्जेराव मुंडे, इनायत अली, वसीम अखील अहेमद, पंढरीनाथ कालाने, जलील अहेमद खान आदींनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, दोन दिवसात लागलेल्या दोन विभागातील आगीच्या या घटनेमुळे शासकीय रुग्णालय व परिसरात खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

आगीच्या चौकशीसाठी आजच केली होती समिती गठीत
शनिवार, ६ फेबु्रवारी रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपघात विभागाच्या वरिल मजल्यावरील जिन्यात ठेवलेल्या साहित्यास आग लागली होती. याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी चौकशी समिती आजच गठित केली होती. तीन दिवसात समितीने चौकशी अहवाल सादर करावा, असेही आदेश जिल्हाधिका-यांनी दिले होते. या समितीत उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रकाश डाके, महापालिकेचे उपायुक्त गायकवाड यांची सदस्य म्हणून तर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिका-यांनी केली पाहणी
आज रविवारी सायंकाळच्या सुमारास लागलेल्या आगीनंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्यासह प्रशासनातील अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.