परभणी : मोठा गाजावाजा करत रेल्वे विभागाने मुदखेड ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची प्रक्रीया सुरू केली आहे. गेली अनेक दिवस रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे हे काम सुरु आहे. परंतु परभणी ते मनमाड या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची प्रक्रीया स्थगीत केल्याची माहिती आहे. मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी विचारलेल्या माहिती अधिकारातील प्रश्नाला रेल्वे बोर्डाने हे उत्तर दिल्याचे समोर आले आहे.या सोबतच इतर मार्गांनाही स्थगिती देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
ओमप्रकाश वर्मा यांनी मध्य रेल्वेला ३० नोव्हेंबर २०२० रोजी माहिती अधिकारात ही माहिती विचारली होती. त्यांना २० जानेवारी २०२१ रोजी ही माहिती रेल्वे विभागाडून देण्यात आली आहे. २११९.३९ कोटी रुपये खर्च व २.१२ टक्के नफा ८ डिसेंबर २०१७ रोजी २९१ कि.मी मार्गासाठी दाखविण्यात आला होता. या प्रकल्पाला रेल्वे बोर्डाने स्थगिती देण्याचे सांगण्यात आले. वाशिम-माहूर-आदिलाबाद हा १८९ कि.मी. महाराष्ट्र व तेलंगनासाठीचा ३२३४.३२ कोटीचा प्रकल्प ८ डिसेंबर २०१७ रोजी ४८ टक्के तोटा असल्याने स्थगित केल्याची स्पष्ट केले आहे. लातूररोड ते नांदेड हा १५५ कि.मी.चा रेल्वेमार्ग मध्यरेल्वेकडून दक्षिण मध्यरेल्वे सिकंद्राबादकडे हस्तांतरीत केला होता. यामार्गावर २ हजार ५२ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. हा प्रकल्प ६.७० टक्के तोट्यात असल्याने रेल्वेबोर्डाने २५ ऑक्टोबर २०१७ रोजीच स्थगित केला आहे.