विजय कुलकर्णी/परभणीः जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे वाळूची अवैध व चोरट्या पध्दतीने वाहतुक करणारे टिप्पर मंगळवारी सकाळी चारच्या सुमारास जप्त करीत एकाला ताब्यात घेतले. या कारवाईत पथकाने ९ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
विशेष पथकातील परिविक्षाधीन पोलिस उपाधिक्षक बापुराव दडस, फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, राहूल चिंचाणे, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, शेख फारूखी, अजहर पटेल, विष्णू भिसे, दीपक मुदीराज, अरुण कांबळे हे जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्यासाठी गस्तीवर असताना पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी परिसरात वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पथकास मिळाली.
पथकाने आहेरवाडी परिसरातून भरधाव जाणाऱ्या एका टिप्परला थांबवले. चालकाकडे वाळूबाबत विचारणा केली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तसेच वाळूची चोरट्या पध्दतीने वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येताच पथकातील कर्मचाऱ्यांनी टिप्पर जप्त केला. तसेच एकास ताब्यात घेतले. या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ९ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करीत एकास ताब्यात घेतले असल्याचे नमुद केले.