विजय कुलकर्णी/परभणी : सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील लोअर दुधना प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील लाभक्षेत्रासाठी शुक्रवार दि.१२ रोजी तिसरी पाणीपाळी सोडण्यात आली. यावेळी सेलूचे उपविभागीय अधिकारी सतीश बागले, कनिष्ठ अभियंता मंगल पांडे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुभाष राऊत, सबनीस आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, प्रकल्पातून शुक्रवारी तिसरी पाणीपाळी सोडण्यात आली असून २५ फेब्रुवारीपर्यंत हे पाणी राहणार आहे. शेतक-यांनी रब्बी हंगामासाठी या पाण्याचा उपयोग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्यातील लाक्षक्षेत्रातील पिकांसाठी लोअर दुधना प्रकल्पाच्या कालव्यांव्दारे शुक्रवारी पाणी सोडण्यात आले. उजव्या कालव्यास ९० क्युसेस तर डाव्या कालव्यास १२५ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. या पाणी पाळीमुळे चार तालुक्यातील शेतक-यांना या पाण्याचा सिंचनासाठी लाभ मिळणार आहे. त्यात सेलू, जिंतूर, मानवत व परभणी या तालुक्यातील गावांचा समावेश असणार आहे. यंदा लोअर दुधना हे धरण शंभर टक्के भरले आहे. मागली दहा वर्षात प्रथमच धरण १०० टक्के भरले आहे. या प्रकल्पाचा उजवा कालवा ४८ किलोमीटर तर डावा ६९ किलोमीटरचा आहे. दोन्ही कालव्यातून पाणी सोडले तर सेलू, मानवत, परभणी आणि जिंतूर तालुक्यातील कालवा लाभक्षेत्रातील तब्बल १३ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी मिळते. परभणीतील टाकळी, नांदापूर, खानापूर मांडवा, जलालपूर, झरी, कुंभारी, वाडीदमई, हिंगला, सुलतानपूर, पिंपळा, सनपुरी आदी गावांसह अन्य शेकडो गावांना या पाण्याचा उपयोग होणार असल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.