माधव पिटले/निलंगा: तालुक्यातील उमरगा वन क्षेत्रातील विना परवाना झाडे तोडून एका कर्मचाऱ्याने परस्पर विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी तक्रार गावकऱ्यांनी वनमंत्री व पर्यावरण मंत्री यांच्याकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, निलंगा तालुक्यातील उमरगा हा.येथे वन विभागाचे २२ एकरवर वनक्षेत्र आहे. येथील कर्मचारी अनेकवेळा येथील विना परवाना झाडे तोडण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. यावर तालुका नवअधिकारी व कर्मचारी यांची मिलीभगत असल्यामुळेच असे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. गावाकऱ्यांनी ही झाडे का तोडली व ते कोठे विक्री केली अशी विचारणा केली असता सदरील कर्मचाऱ्याने झाडे तोडून परस्पर विक्री केल्याची कबुली दिली.
तोडलेली झाडे निलंगा शहरातील एका मिलवर ठेवली असून ती परस्पर पैसे घेऊन विक्री केली असल्याची कबुली त्याने दिली. ब-याच वेळा असे परस्पर झाडे तोडण्याचा प्रकार घडत आहे मात्र यावर वरिष्ठांची वचक राहिली नाही असा आरोप ही गावकरी करत आहेत.शासन स्तरावर पर्यावरण वाढीसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. झाडे लावा झाडे जगवा या शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून सदरील उमरगा हा.येथील कर्मचारी मनमानी कारभार झाडांची कत्तल करत आहेत.असा आरोप गावाकऱ्यांनी केला आहे.
याबाबत तालुका वन अधिकारी बन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हो आमच्याच एका कर्मचाऱ्याने तोडून एका मिलवर टाकले आहेत. ते परत आणून वन विभागात ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली.
उमरगा हा.येथील रहिवासी तथा शिवसेनेचे माजी संघटक जगदिश लोभे व विलास लोभे यांच्यासह काही गावक-यांनी वनमंत्री संजय राठोड व पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे व वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे लेखी ऑनलाईन तक्रार केली असून संबंधित तालुका वनअधिकारी व वन कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची ही मागणी केली आहे.