मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही. दहा वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचारी वर्गाला पूर्णवेळ वेतन आणि २००५ मधील कर्मचाऱ्यांना पूर्ण लाभ मिळतील असा शब्द आयुक्त रविराज इळवे यांनी दिला. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे कामगार नेते यशवंत भोसले यांच्या सोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्वाळा दिला.
यशवंत भोसले यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मंडळातील कर्मचारी विषयावर मोठी आणि दीर्घकाळ चर्चा झाली. २००५ साली भरती झालेल्या कर्मचारी वर्गाची सेवा आता १५ वर्षे लोटली तरी न्यायालयीन लढाईत अडकली आहे. यामुळे बढती, पीएफ आणि अन्य विषयात या कर्मचारी वर्गाची मोठी अडचण झाली आहे. ही अडचण दूर करण्याच्या सूचना लवकरच दिल्या जातील याबाबत कल्याण आयुक्तांनी भोसले यांना आश्वस्त केले. तसेच मागील मंडळात सेवेची दहा वर्षे पूर्ण झालेल्या अर्धवेळ कर्मचारी वर्गास पूर्णवेळ किमान वेतन म्हणून १० हजार देण्याचा ठराव घेण्यात आला होता. मंडळ अस्तित्वात असेपर्यंत याची अमंलबजावणी झाली मात्र मंडळ पायउतार होताच हा ठराव गुंडाळून ठेवण्यात आला. या ठरावाची अंमलबजावणी देखील करण्याबाबत विचार करू असा शब्द कल्याण आयुक्तांनी दिला.
२००५ च्या कर्मचाऱ्यांना बढती पी एफ मिळणार
मंडळात २००५ साली मोठी भरती झाली होती. यात अनियमितता असल्याची तक्रार आल्याने न्यायालयीन लढाई चालू आहे. याच खटल्यामुळे या कर्मचाऱ्यांना बढती अथवा पीएफची ना परतावा रक्कम मिळत नव्हती. या बाबत इळवे यांनी सर्व कर्मचाऱ्याना समान न्याय देण्या बाबत भूमिका घेऊ असा शब्द दिला.