विजय कुलकर्णी/ परभणी : तालुक्यातील संबर येथे वाळूची अवैध वाहतुक करणारे दोन टिप्पर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार दि.१० रोजी मध्यरात्री जप्त केले. यामध्ये सुमारे १० लाखांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे.
परभणी तालुक्यासह जिल्ह्यात अवैध वाळूची वाहतुक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवैध उत्खणन करून वाळूची चोरटी वाहतुक सर्रास सुरु आहे. वाळूच्या चोरट्या वाहतुकीस पायबंद घालण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी पोलिसांना दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी कर्मचारी बालासाहेब तुपसमिंद्रे, हरिचंद्र खुपसे, किशोर चव्हाण, शेख अजहर, दिलावर पठाण यांना अवैध धंद्यांची माहिती काढत कारवाईचे आदेश दिले होते. तसेच अवैध वाळू उपसा व वाहतुक करणा-या वाहनांवर तात्काळ कारवाईचे आदेशही त्यांनी दिले होते.
बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकास संबरमध्ये वाळूची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थागुशाचे पथक बुधवारी रात्री संबर येथे दाखल झाले. त्यावेळी संबर शिवार ते सावंगी शिवारामध्ये पूर्णा नदी पात्रात रेतीची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने रेती उत्खणन करून एम.एच.२० बी.टी. ६८८० चा चालक व टिप्पर क्र. एम.एच. ०४ ई.वाय. ७२४२ चा चालक शेख शौकत हा रेती टिप्परमध्ये भरत असताना पोलिसांना पाहून पळून गेला. हे दोन्ही टिप्परच्या चालक रेतीची चोरटी वाहतुक करण्यासाठी ही रेती टिप्परमध्ये भरत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यावरून पथकाने दोन्ही टिप्पर जप्त करीत एका चालकास ताब्यात घेतले. सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त करत ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. हरिचंद खुपसे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस् ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी राजू राठोड हे करीत आहेत.