विश्वनाथ हेंगणे / हाडोळती : नगदी पैशाचे पीक म्हणून टमाट्याची ओळख आहे. त्यामुळे शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात टमाट्याची लागवड करतात. त्यातून उत्पन्न ही चांगले मिळते. मात्र यावर्षी टमाटा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण चांगला भाव मिळत नाही. टमाटे तोडणे देखील परवडत नसल्याने शेतकरी आपल्या पीकात जनावरांना सोडून देत आहेत.
अहमदपूर तालुक्यात नगदी पैशाचे पिक म्हणून प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात टमाटा लागवड केली जाते. टमाटा लागवड ते काढणी पर्यत अंदाजे एकरी 80000 ते 90000 हजार रूपये तार, काठी सुतळी, फवारणीसाठी खर्च होतात. उत्पादन चांगले मिळेल या आशेने शेतकरी मेहनत करत असतो. मात्र यावर्षी शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. कारण खर्च सुध्दा निघणे कठीण झाले आहे. यातच खत, बी-बियाणे उधार घेतलेल्या सावकाराला पैसे द्यायचे कसे? घर प्रपंच कसा चालवायचा? आदी प्रश्नांनी शेतकरी चिंतेत आहे.
उत्पन्न चांगले मिळेल या आशेने शेतक-याने टोमॅटोची लागवड केली मात्र यावर्षी उलट चित्र बघायला मिळत आहे.मुंबई -दिल्ली येथील व्यापारी 25 ते 30 किलोचे कॅरेट 50 रुपयांप्रमाणे खरेदी करत आहेत. त्यामुळे खर्च व उत्पादनाचा विचार केला तर मोठा तोटा शेतक-यांना होत आहे. त्यामूळे शेतकरी टोमॅटो तोडणे परवडत नसल्याने पीकात जनावरांना सोडून देत आहेत. काही शेतकरी आपले उकडे भरत आहेत. कधी निर्सग साथ देत नाही तर कधी भाव मिळत नाही. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. यावर्षीही शेतकर्यांचा पदरात फक्त निराशाच पडणार आहे