विजय कुलकर्णी/परभणीः जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून मोटारसायकल सहजपणे लांबविणार्या चोरट्यांची एक टोळी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने उघडकीस आणली असून त्या टोळीतील चौघांना अटक करीत त्यांच्याकडून ३२ मोटारसायकल जप्त केल्या.
गुरुवार रोजी विशेष पथकाचे अधिकारी-कर्मचारी हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी खबर्यामार्फत खात्रीशीर माहिती हाती आली. त्याप्रमाणे जिंतूर रस्त्यावरील ईदगाह मैदानावर चौघेजण दोन मोटारसायकल घेऊन विक्री करिता येत असल्याचे कळाले होते. त्यानुसार या पथकाने ईदगाह मैदानावर सापळा रचला. दोन मोटारसायकल व त्यावरील व्यक्ती दबा धरून वाट पाहताना व दोन मोटारसायकलवर दोन व्यक्ती शारदा महाविद्यालयाच्या पाठीमागील भिंतीजवळ थांबले असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्याचवेळी या पथकाने त्या दोन्ही मोटारसायकली व व्यक्तींना ताब्यात घेतले. तेव्हा त्यांनी उडावाउडवीची उत्तरे दिली. पोलिस खाक्या दाखवताच या चौघांनी चोरीच्या मोटारसायकल विक्रीस आणल्याचे नमुद केले. महादेव दिलीप घोगरे विशाल रमेश इंगळे व शाम नामदेव हरकळ (तिघेही रा.रेणाखळी, ता.पाथरी) व कैलास बाबासाहेब शेळके (रा. उमरा, पाथरी) या चौघांची सखोल चौकशी केली असता एकूण ३२ मोटारसायकल चोरल्याचे त्यांनी कबुल केले. रेणाखळीतील शाम हरकळ यांच्या शेतात त्या मोटारसायकल ठेवल्याचे स्पष्ट झाल्याबरोबर पोलिसांनी त्या मोटरसायकल जप्त केल्या चोरलेल्या मोटरसायकल परभणी, जालना, बीड, नांदेड, अहमदनगर व पुण्यातील आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक बापुराव दडस, फौजदार चंद्रकांत पवार, फौजदार विश्वास खोले, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीरोद्दीन फारूकी, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, अजहर पटेल, राहूल चिंचाणे, बालाजी रेड्डी, दीपक मुदीराज, विष्णू भिसे, समीर पठाण, अरूण कांबळे यांनीही कारवाई यशस्वी केली.
या आरोपींनी अजुन काही गुन्हे केले आहेत का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी दिली.