सुमित दंडुके / औरंगाबाद : कामावर निघालेल्या दोन तरुणांना बीडबायपास रोडवरील नाईकनगर कमानीजवळ भरधाव ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर ट्रक चालक ट्रक सोडून पसार झाला. संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करून ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. पण पुंडलीकनगर पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी जमावाला पांगवले.
सचिन कल्याण राठोड (वय.३०, रा.नाईकनगर बायपास) आणि नितेश कुंडलिक पवार (वय.३२, रा.पारेगाव तांडा पैठण, सध्या शिवाजीनगर) अशी मयत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही नात्याने आतेभाऊ-मामेभाऊ होते. आणि दोघेही जेसीबी ऑपरेटर म्हणून कामाला होते.
सचिन आणि नितेश दोघे काल दुपारी ३ वाजेच्या सुमारास नाईकनगरकडून झाल्टा फाट्याकडे दुचाकीवरुन जात होते. नाईकनगर कमानीकडून रस्ता ओलांडून ते झाल्ट्याकड़े जाणाऱ्या रोडवर आले, तेवढ्यात देवळाई चौकातुन झाल्ट्याकडे जाणाऱ्या मालवाहु ट्रक (क्र.एमएच ०४ जीआर ४९६०) ने दोघांना धडक दिली. यात दोघांच्याही अंगावरुन ट्रकचे चाक गेल्याने दोघेही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळयात पडले.
घटनेनंतर ट्रकचालक ट्रक सोडून पसार झाला. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती लगेच पोलिसांना कळविली, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना खाजगी रुग्णालयात हलविले. तिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषीत करत घाटी रुग्णालयात हलविले.
अपघाताची पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून फरार ट्रकचालकाचा शोध पोलीस घेत आहेत.