विजय कुलकर्णी/परभणी: जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने तालुक्यातील पेडगाव येथुन गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे दि. २२ रोजी रात्रीच्या सुमारास जप्त केले.
दरम्यान, केवळ वाळूचे टिप्पर व छोट्या-मोठ्या कारवाया करून घेण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी मश्गूल असल्याचे दिसून येत आहे. शहर व जिल्ह्यात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दुर्दैवी चित्र यातून दिसून येत आहे. भर रस्त्यावर लुटमारीसह गावठी पिस्टल सर्रास आढळून येत आहेत. गुरुवारी रात्री शहरातून एक देशी बनावटीचे पिस्टल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले होते.त्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे.
विशेष पथकाचे फौजदार चंद्रकांत पवार, फौजदार विश्वास खोले यांना पेडगाव येथे एक व्यक्ती बेकायदेशीररित्या बंदूक जवळ बाळगुन असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून फौजदार खोले व फौजदार पवार यांनी पोलिस अधीक्षक मीना यांच्या मार्गर्शनाखाली परिवीक्षाधीन उपाधीक्षक बापूराव दडस यांच्यासह कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, राहुल चिंचाने, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड़, फारूकी, अजहर पटेल, विष्णु भिसे, दीपक मुदीराज, अरुण कांबळे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास पेडगावात छापा टाकत जावेद खान यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस जप्त केले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भगवान जाधव करत आहेत.