नवी दिल्ली : दिल्लीत गेल्या ६० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. आज एकीकडे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजपथावर परेड सुरु आहे. या परेडसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही हजेरी लावलीय. तर दुसरीकडे इथून अगदी काही किलोमीटर अंतरावर दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलक आणि पोलीस यांच्यात धुमश्चक्री झाली आहे.
शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाल्यानंतर दिल्लीच्या दिशेने निघालेल्या हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले. बॅरिकेट्स तोडून शेतकरी दिल्ली हद्दीवर दाखल झाले आहेत. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. परंतु, शेतकऱ्यांनी काही वेळ आधीच आपल्या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले.
पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेडस् उभारले. इतकंच नाही तर राजधानीकडे निघालेल्या वाहनांना रोखण्यासाठी करनाल बायपासवर मंगळवारी एका रात्रीतच एक भली मोठी तात्पुरती भिंत उभारण्यात आली. परंतु, शेतकरी आंदोलक मात्र आपल्या निश्चयावर ठाम आहेत.

कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे बॅरिकेडस् तोडून दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला.
पोलिसांकडून नांगलोईमध्ये ठिकठिकाणी रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी मध्य दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.