विजय कुलकर्णी/परभणी: जिल्ह्यातील इतिहास अभ्यासक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या अभ्यासगटाच्या दौर्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते काल करण्यात आला. यावेळी अभ्यासगटचे नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर आणि अभ्यास गटाचे सचिव तथा या प्रकल्पाचे समन्वयक जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर यांची उपस्थिती होती.
प्राचीन वारसा लाभलेल्या परभणी जिल्ह्यात अनेक पुरातन वास्तु अस्तित्वात असून जिल्ह्यात चालुक्य कालीन शिल्प, भव्य मंदिरे, नानाविध शिल्पकलाकृती, मनमोहक पुष्करणी, शिलालेख विपूलतेने उपलब्ध आहेत. परभणी जिल्ह्यातील हा ऐतिहासिक ठेवा म्हणजे अभ्यासक, इतिहासप्रेमी, जाणकार आणि संशोधकांसाठी एक समृध्द भांडार आहे.
परभणी जिल्ह्याची ही ओळख सर्व जगास होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील वास्तुशिल्पकलेच्या शास्त्रीय आणि ऐतिहासिक माहितीचे दस्तऐवजीकरण करण्याच्या हेतुने परभणी जिल्ह्यातील सर्व पुरातन स्थापत्य कलेच्या अविष्कारांची एक समग्र माहिती पुस्तिका ग्रंथ स्वरूपात निर्माण करुन याविषयी एक स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करणे आणि या विषयावर एक लघुपट निर्माण करण्याचा प्रकल्प जिल्हा प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातील एकूण 31 ठिकाणांची सूची तयार करण्यात आली असून त्यात प्रामुख्याने जिंतूर तालुक्यातील चारठाणा, नेमगिरी, भोगाव, वरूड, बोरी, बामणी, केहाळ, कोठा, माणकेश्वर, परभणी तालुक्यातील साळापुरी, पिंगळी, नवागड, जांब आणि पोखर्णी, तसेच गंगाखेड तालुक्यातील धारासूर, महातपुरी, इसाद, राणीसावरगाव, सेलू तालुक्यातील वालूर, हातनूर, ढेंगळी पिंपळगाव गोसावी, पूर्णा तालुक्यातील गौर, एरंडेश्वर, वझूर, कंठेश्वर, पालम तालुक्यातील मार्तंडवाडी आणि आणि पाथरी तालुक्यातील मुद्गल, रत्नेश्वर रामपुरी, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव, मानवत तालुक्यातील लोहारा या ठिकाणचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील इतिहास अभ्यासक आणि प्रशासकी अधिकारी यांचा अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. सदर अभ्यासगटास मार्गदर्शक म्हणून मूर्तीशास्त्र अभ्यासक आणि मंदिरस्थापत्य विषय तज्ञ आणि पुरातत्व खात्यातील अधिकारी काम पाहणार आहेत. या अभ्यासगटाच्या सदस्यांव्दारे सर्व ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देउन ऐतिहासिक आणि संशोधनात्मक माहिती संकलीत करण्यात येणार आहे.