सुमित दंडुके : भारतात काही विशिष्ट व्यक्तींना पोलीस किंवा स्थानिक प्रशासनातर्फे सुरक्षा प्रदान केली जाते. या महत्त्वाच्या किंवा अति महत्वाच्या व्यक्तींच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. संभाव्य धोक्याची पातळी किती आहे यावरून कोणत्या दर्जाची सुरक्षा द्यायची हे ठरवले जाते. भारतामध्ये व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या सुरक्षेला चार भागात विभागले गेले आहे Z+, Z, Y आणि X.
याचबरोबर एक विशिष्ट प्रकारची सुरक्षा असते ती (SPG) स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ही अत्युच्च दर्जाची सुरक्षा फक्त पंतप्रधानाना असते.
कोणत्या दर्जाच्या सुरक्षेत काय असते बघुया,
(SPG) स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप - ही सुरक्षा भेदणे अतिशय कठीण असते. सीआरपीएफकडून ही सुरक्षा पुरविली जाते. ही सुरक्षा फक्त पंतप्रधान यांना आहे.
Z+ दर्जाची सुरक्षा - यात ५५ कर्मचारी एका वेळी कार्यरत असतात. त्यात दहापेक्षा जास्त NSG (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) आणि इतर पोलीस समाविष्ट आहेत. यातील प्रत्येक कमांडो हा मार्शल आर्ट्स मध्ये निपुण असतो व विनाशस्त्र आमने सामने मुकाबला करण्यासाठी तयार केलेला असतो. झेड प्लस सिक्युरिटी ही NSG द्वारे दिली जाते.
Z दर्जाची सुरक्षा - ही दुसऱ्या क्रमांकाची सुरक्षा श्रेणी मानली जाते. झेड सिक्युरिटी मध्ये एकूण २२ कर्मचारी कार्यरत असतात. त्यात ४ ते ५ NSG कमांडो आणि बाकी पोलीस दलातील व्यक्ती असतात. झेड सिक्युरिटी दिल्ली पोलीस अथवा CRPF द्वारे पुरवली जाते. यात एक संरक्षक कारचा देखील समावेश असतो.
Y दर्जाची सुरक्षा - ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था आहे. वाय दर्जाच्या सिक्युरिटी मध्ये एकूण ११ कर्मचारी असतात ज्यात १ किंवा २ कमांडो आणि बाकी पोलीस ऑफिसर्स कर्तव्य बजावत असतात. यामध्ये २ PSO (Personal Security Officer) सुद्धा असतात.
X दर्जाची सुरक्षा - एक्स सिक्युरिटी ही चौथ्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था आहे. यामध्ये २ कर्मचाऱ्यांचे संरक्षण मिळते. यात कमांडो सामील नसतात तर २ पोलीस ऑफिसर्स संरक्षणासाठी तैनात असतात. सोबतच १ पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर सुद्धा या सुरक्षा श्रेणीत असतो.