विजय कुलकर्णी/ परभणी : जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या संशयावरून ५७ पोते गहू वाहनासह जप्त केला.
यावेळी विशेष पथकाचे परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक बापुराव दडस, फौजदार चंद्रकांत पवार, फौजदार विश्वास खोले यांच्यासह कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, विष्णू भिसे, अजहर पटेल, अरुण कांबळे आदी ऊपस्थित होते.
पोलिसांच्या पथकाला एका वाहनातून पूर्णेकडून परभणीला स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने वसमत रोड येथे वाहन (क्र.एमएच २६, एच १९८६) ताब्यात घेतले. वाहनात ५७ पोते गहू आढळून आला. वाहनचालकाची पथकातील अधिकारी-कर्मचा-यांनी चौकशी केली. त्यावेळी त्याने राम बोकारे असे नाव सांगितले. तसेच वाहन मालकाच्या सांगण्यावरून धान्य आणले असल्याची माहिती दिली. वाहनातील गव्हाबाबत कुठलीही कागदपत्रे वाहनचालकाला दाखवता आली नाहीत. दरम्यान, हा गहू स्वस्त धान्याचा असल्याचा संशय असून याबाबत महसूल अधिकारी गव्हाची तपासणी करून अहवाल देणार आहेत. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होणार आहे.