सिद्धेश्वर गिरी / सोनपेठ :ग्रामीण भागातील गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या पाठीचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आरक्षण ठरले आहे. या आरक्षणानंतर काही इच्छूकांच्या आशेवर पाणी फेरले असून आरक्षणानंतर झालेल्या बदलात प्रामुख्याने कान्हेगाव आणि लासीनाचा समावेश आहे. यात कान्हेगाव येथील जागा सर्वसाधारण पुरुषाला आरक्षित झाली होती. मात्र नंतरच्या बदलात सदरच्या जागेवर सर्वसाधारण महिलेस संधी मिळाली आहे.
लासीना येथील जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षित झाली मात्र निवडणुकीनंतर झालेल्या बदलात ही जागा सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुषास आरक्षित झाल्याने येथील इच्छूकांच्या आशेवर पाणी फेरले आहे. आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात प्रथमच निवडणुकीनंतर आरक्षण बदलल्याने ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी खर्च केलेल्या उमेदवारांना आता खरी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. यातील कान्हेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पती आणि पत्नी दोघांनीही आपले नशीब राजकीय पदार्पणात आजमावले होते. या दोघांनाही या निवडणुकीत यश आले असून आरक्षण बदलामुळे येथील जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेस आरक्षित झाली आहे. येथे पत्नी सरपंच म्हणून सभागृहात दिसणार आहे. तर पती ग्रामपंचायत सदस्य म्हणून जनतेचे प्रश्न सोडवण्यास सज्ज झाला आहे. ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा ठरला आहे. मागील सरकारने सरपंचांना दिलेल्या जास्तीच्या अधिकारांमुळे नवीन सरपंचाची चांदी होणार आहे. म्हणूनच यावेळी प्रचारयंत्रणा सक्रिय राबवून पॅनलप्रमुखांनी आपलाच गट कसा निवडून आणता येईल यासाठी परिश्रम घेतले आहेत.
प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कान्हेगाव ग्रामपंचायत निवडणूकीत काट्याची टक्कर झाल्यासारखी निवडणूक झाली मात्र यात मतपेटीतून मतदारांनी रामेश्वर मोकाशे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला भरभरून प्रतिसाद देत प्रत्येक जागेवर १५० ते २०० चे मताधिक्य दिले. यातून रामेश्वर मोकाशे यांनी ११ पैकी ९ जागा जिंकल्या आहेत. मोकाशे दांपत्य निवडून आले असून बदललेल्या आरक्षणात महिला प्रवर्गास जागा आरक्षित झाल्याने बेबीसरोज रामेश्वर मोकाशे ह्या सरपंचपदी विराजमान होतील तर युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदस्य म्हणून सभागृहात असतील.