देशातील पहिले पर्यटन जेल 'येरवडा'

भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरु- गृहमंत्री अनिल देशमुख

देशातील पहिले पर्यटन जेल 'येरवडा'

पुणे : देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात येरवडा जेलने अनेक घटनांचा इतिहास रचलेला आहे.पुण्यातील हे जेल पर्यटन जेल म्हणून २६ जानेवारीला सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या जेलमध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरु केला जात आहे. विद्यार्थी,इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना या उपक्रमात जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती घेता येईल. पहिल्या टप्प्यात येरवडा कारागृहातुन या उपक्रमाची सुरुवात केली जाईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

पुण्यातील येरवडा कारागृहात जेल पर्यटन राबवण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे.पर्यटनाच्या माध्यमातून नागरिकांना येरवडा कारागृहाची सफर घडविण्यात येणार आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील मोठा भाग हा येरवडा कारागृहाशी जोडला गेला आहे. महात्मा गांधी यांच्यासह अनेक नेते स्वातंत्र्य चळवळीदरम्यान येरवडा कारागृहात बंदिस्त होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील पुणे करार देखील याचं कारागृहात पार पडला होता. स्वातंत्र्यानंतर अनेक महत्त्वाच्या खटल्यांमधे दोषी ठरलल्या गुन्हेगारांना या कारागृहात फाशी देण्यात आली. देशाचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी असलेल्या जिंदा आणि सुखा तसेच मुंबईतील २६/११च्या दोषी अजमल अमीर कसाब यालाही याचं कारागृहात फाशीवर लटकवण्यात आले होते.

येरवडा कारागृहातील अशी ठिकाणे या कारागृह पर्यटनादरम्यान पाहता येणार आहेत. त्यासाठी तुरुंग प्रशासनाकडून गाईड देखील पुरवण्यात येणार आहे. एकावेळी ५० व्यक्तींना या कारागृह पर्यटनासाठी तुरुंगामध्ये सोडण्यात येईल. त्यासाठी किमान सात दिवस आधी इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीनं किंवा येरवडा कारागृहाच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्षपणे बुकींग करावे लागणार आहे. या कारागृह पर्यटना दरम्यान कोणतीही वस्तू, मोबाईल किंवा कॅमेरा आतमध्ये नेता येणार नाही. मात्र आतमध्ये गेलेल्या पर्यटकांचे फोटो काढण्याची सोय करण्यात येणार असून आतमध्ये काढलेले फोटो पर्यटकांना नंतर पुरवण्यात येणार आहेत.

शाळा, कॉलेज व शैक्षणिक अस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना यांनी ही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभागाद्वारे जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे.असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच येरवडा कारागृहापाठोपाठ राज्यातील इतरही कारागृहांमध्ये अशाच प्रकारे पर्यटन सुरु करण्याचा विचार असल्याचे मंत्री अनिल देशमुखांनी सांगितले आहे. २६ जानेवारीला या मोहिमेला सुरूवात होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.