परभणी : महानगर पालिका हद्दीतील चौकांसह रस्त्यांवरील १ हजार ३०५ अतिक्रमणे महापालिकेव्दारे लवकरच हटवल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.
आ. बाबाजानी दुर्राणी, आ. सतीश चव्हाण, आ. अमोल मिटकरी व आ.विक्रम काळे यांनी परभणी महानगर पालिका हद्दीतील बेसुमार अतिक्रमणांबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. त्याव्दारे महानगर पालिका हद्दीतील शासकीय जागा, महापालिकेच्या जागा, तसेच मुख्य चौकांसह रस्त्यांच्या दुतर्फा, शाळा, बाजारपेठ वगैरे भागात हजारो अतिक्रमणे विसावली आहेत, असे निदर्शनास आणून या अतिक्रमणकर्त्यांच्या विरोधात मनपाद्धारे ठोस व कठोर कारवाई होत नाही, असे नमूद केले. विभागीय महसूल अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी गतवर्षी या अतिक्रमणकर्त्यांना तत्काळ हटवावे, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु परभणी महापालिकेने कारवाई केली नाही. अतिक्रमणे हटवली नाहीत. फुटपाथवरील अडथळे दूर केले नाहीत. हॅकर्स झोनही निर्माण केले नाहीत, असे स्पष्ट केले.
राज्याचे नगरविकासमंत्री शिंदे यांनी महापालिका प्रशासनास विभागीय आयुक्तांव्दारे वांरवार सूचना दिल्या गेल्या होत्या, हे स्पष्ट करीत परभणी शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटवण्याबाबत उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने सुमोटो रीट याचिका दाखल केली. या रिट याचिकेत न्यायालयाने अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्याकरिता ३१ जाने २०२१ पर्यंत स्थगिती दिली. न्यायालयाच्या या स्थगितीमुळे ३१जानेवारी २०२१ पर्यंत अतिक्रमणे हटविण्याची कारवाई झाली नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. महापालिकेने सर्वेक्षण करून एक हजार ३०५ अतिक्रमणांची यादी तयार केली आहे. दहा फेब्रुवारी २०२१ पासून सद्यस्थितीत २४० पेक्षा जास्त अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, याचीही दक्षता घेण्यात येत असून उर्वरित सर्व अतिक्रमणे काढण्याची कारवाई, महापालिकेकडून केली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
शहरातील नागरिक व व्यावसायिक यांना राहती घरे व व्यवसायाच्या ठिकाणी नाल्यावर बांधलेले ओटे, फरश्यांचे आवरण, तसेच नालीच्या समोर उभारलेली कच्ची व पक्की अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत, असे निर्देश दिल्या गेले आहेत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. शहरात हॉकर्स झोन तयार करण्यासाठी फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले असून फेरीवाला प्राथमिक झोन तयार करण्यात आले आहेत, सदर कारवाई अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेने कळवली असल्याचे शिंदे यांनी सभागृहात नमूद केले.