सिद्धेश्वर गिरी/सोनपेठः सोनपेठ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने आता वेग घेतला आहे. तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर सर्वच प्रमुख नेत्यांनी तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले होते. तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीच्या निवडी बिनविरोध झाल्या तर उर्वरित ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रंगत येणार असल्याचे दिसत आहे. एकंदर राज्य पातळीवरून भाजपाला शह देण्यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचे ठरवले खरे! मात्र सोनपेठ तालुक्यात प्रमुख नेत्यांच्या गावात निवडणुका होत असल्याने महाविकास आघाडीने ठरवलेल्या आणि रणनीतीला खो बसल्याचे चित्र यावरून स्पष्ट झाले आहे.
तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या गावातील निवडणूका बिनविरोध पार न पडल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीत दुरावा झाल्याची चर्चा होत आहे. यासोबतच खडका येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी-भाजपा सहयोगी पुरस्कृत पॅनल म्हणून निवडणुक पार पडत आहे. तसेच निमगाव,शेळगाव, कान्हेगाव, धामोनी,बोदंरगाव,खपाट पिंपरी,गवळी पिंपरी,नरवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकातील समीकरणे येणाऱ्या काळासाठी महत्वाची ठरणार आहेत. यात तालुक्यातील कोरटेक,मोहळा,गंगापिंपरी,बुक्तरवाडी,पोंहडुळ या गावाची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने प्रशासनाला सहकार्य लाभणार असल्याचे कळते. यासोबतच शेळगाव येथील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीसाठी राजकीय पक्षाचे वलय असणाऱ्या नेतृत्वासाठी येथील निवडणूक बिनविरोध न झाल्याने निवडणुकीत रंगत येणार असल्याचेही स्पष्ट होत आहे. कारण शेळगाव जिल्हा परिषद सर्कलसाठी हे गाव समीकरणे बदलणारे ठरले आहे.