अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई मिळावी-अनिल घनवट

1 min read

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई मिळावी-अनिल घनवट

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. कापणीला आलेली पिके नष्ट झाली आहेत. पुर्ण हंगाम कष्ट व खर्च करुन हाताशी आलेली पिके खराब झालेली, वाहुन जाताना शेतकर्‍यांना पहावं लागत आहे.

सिध्देश्वर गिरी/प्रतिनिधी: राज्यात अतिवृष्टी होत असून नुकसान झालेल्या पिकांची हेक्टरी ५० हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. कापणीला आलेली पिके नष्ट झाली आहेत. पुर्ण हंगाम कष्ट व खर्च करुन हाताशी आलेली पिके खराब झालेली, वाहुन जाताना शेतकर्‍यांना पहावं लागत आहे. केलेला खर्च वाया गेला आहे. घेतलेले कर्ज कसे फेडायचे व वर्षभर प्रपंच कसा चालवायचा हा प्रश्न शेतकर्‍यांच्या समोर आहे.
नैसर्गिक आपत्तीत शेतकर्‍यांना आर्थीक सहाय्य करणे, ही सरकारची जवाबदारी आहे. जनतेला स्वस्त अन्न धान्य मिळावे म्हणून सरकार दर नियंत्रित करून शेतकर्‍याकडे बचत शिल्लक राहू देत नाही म्हणून सरकारने शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य करणे आवश्यक आहे.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल मागवून नुकसानीचा अंदाज घेण्याऐवजी सॅटेलाईट सर्वे किंवा ड्रोन सर्व्हे करुन नुकसानीचे मुल्यांकन करण्यात यावे. नुकसान ग्रस्त भागातील शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावीअशी सुचना शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात केली आहे.
एका हंगामी पिकाला शेतकरी सरासरी १५ हजार रुपये खर्च करत असतो व किमान ५ हजार रुपये त्याला प्रपंच चालवायला गरजेचे आहेत. म्हणुन केंद्र व राज्य सरकारने मिळुन शेतकर्‍यांना एकरी २० हजार रुपये म्हणजे हेक्टरी ५० हजार रुपयांचे अर्थ सहाय्य करावे. फळबागाना नुकसानीची भरपाई किमान एक लाख रुपये हेक्टरी देण्यात यावी. असे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांना पाठवण्यात आली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष,अनिल घनवट यांनी पत्रकारांना दिली आहे.