अग आई.. अहो आई

1 min read

अग आई.. अहो आई

आई .. अग आई असताना खुप प्रेमळ असते. तीच अहो आई झाली की धोरणी का होते. मुलाच्या अथवा मुलीच्या संसारात या अहो आईचा हस्तक्षेप वाढतो आणि लोचा व्हायला लागतो. ती अहो आई झाली तरी अग आई सारखी वागूच शकत नाही का?

अगं आई हा शब्दच मुळात गोड आहे.. निस्वार्थ आणि निर्व्याज आहे. आई आणि मुलं हे नातं जगाच्या कोणत्याही नात्यापेक्षा सुंदर आहे. म्हणून तर प्रेम, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा अशी अनेक शब्द असताना आईच्या प्रेमासाठी 'वात्सल्य' हा नेमका शब्द स्वतंत्र योजिला आहे. आई आणि प्रेम हा विषय आपला आजचा नाही. आणि त्यावर लिहिण्याची माझी क्षमता आणि योग्यता दोन्ही नाही.
एक आई आपल्या लेकीचं लग्न करून देते. आपली लेक आई व्हावी अशी इच्छा ती मनात ठेऊन असते. लेकीला वाढवताना भलेही ती कठोर बनली असेल पण सासरी पाठवताना मात्र ती हळवी झालेली असते. नऊ महिने उदरात सांभाळलेला काळजाचा तुकडा... दोन दशके जपलेला जीव एका क्षणात परका होत असताना ... ती भावूक होते...
आई आपली लेक पाठवत असताना आजी होण्याचे स्वप्न बघत असते आणि त्याचवेळी ती अहो आई ! बनत असते. ( पूर्वी सासूबाई किंवा मामी अशी नावे असायची आता नवं नाव आलेय.. अहो आई!) ही अग आई जितकी प्रेमळ असते ना ती अहो आई बनली की पक्की धोरणी होत असते. मी काही सगळ्याच म्हणत नाही पण अनेकजणी अहो आई बनत आपल्या लेकीच्या संसारात हस्तक्षेप करत जातात. 'माझी लेक सुखात रहावी' ही तिचीच नैसर्गिक भावना तिच्या लेकीला दुःखात तर टाकत नाही ना? याचा विचारच त्यांच्या मनाला स्पर्शत नाही.
जावई भला असतो पण त्याची आई मात्र अडचण असते. बघा हं! एक आईच असा विचार करत असते की दुसरी आई (जावयाची) चांगली नाही. तिच्या मनात असा विचार कधीच येत नाही की, एक आई आपल्या मुलीचा संसार चांगला व्हावा ही कामना ठेऊन असेल तर दुसरी आई आपल्या मुलाचा संसार चांगला व्हावा अशी ईच्छा ठेऊन असेलच की!
इकडे मुलाकडेही असेच! मुलाची 'अगं आई' सुनेची 'अहो आई ' झाली की तिला देखील हा अहो आईचा आजार जडतो आणि गाडी बिघडते.
बायकोच्या प्रेमाखातर (कधी कधी धाक) नवऱ्याने त्याच्या अहो आईची काळजी घ्यायची मात्र नवऱ्याच्या प्रेमाखातर बायको मात्र तिच्या अहो आईची काळजी घेणारच नाही. असे कसे चालेल बरं...
स्वतंत्र घर, स्पेस, मोकळेपणा, करियर,अडचण त्यांना देखील रिलॅक्स वाटणार नाही अशी शब्द वापरत दूर ठेवले जाते.
गंमत म्हणजे एक आईच दुसऱ्या आईला दूर ठेवत असते. अगं आईची अहो आई झाली की असे होते का हो!
अहो आई आल्या की सुनबाई बेचैन... सगळी कामे अडकून पडतात.. अडचण होते.. त्या जरादेखील मदत करत नाहीत. त्या माझी परीक्षा बघतात अशी शब्द येतात.. आणि मागच्याच महिन्यात येऊन गेलेली अगं आई किती दिवस झाले! आलीच नाही.. तिला निवांतपणा मिळतच नाही अशी वाक्य येतात. 'खूप सोसलंय रे माझ्या आईने' असे म्हणताना त्याच्या आईने न सोसताच त्याला जन्म दिला असावा अशी भावना असते?
अगं आई! जेंव्हा अहो आई बनून लेक अथवा सून यांच्या संसारात हस्तक्षेप करू लागते तेंव्हा खरी गोची होते. आपण आपल्या लेकराला मदत करतोय, बळ देतोय अथवा पाठराखण करतोय या समजुती मधून आपणच आपल्या लेकरांचा संसार कठीण करतोय ही गोष्टच अहो आईच्या लक्षात येत नसते की काय?
अपेक्षा एकच आहे की आई कोणतीही असो अगं किंवा अहो त्या प्रत्येक आईंनी आपली गरज मुलांच्या आयुष्यात किती आहे ते लक्षात घेऊनच त्यात हस्तक्षेप करावा..
कधी कधी हा हस्तक्षेप एका असुरक्षित भावनेतून होत असतो. तेंव्हा मुलांनी देखील आपल्या मातापित्यांना अवस्थ आणि असुरक्षित वाटणार नाही याची काळजी घ्यावी
बघा आपले आयुष्य वादाविरहित आणि सुंदर असेल..

सुशील कुलकर्णी