अमरावती : आजारी असलेल्या आठ महिन्यांच्या बाळाच्या पोटावर आई-वडिलांनीच गरम विळ्याचे चटके दिले. अंधश्रद्धेतून मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आई-वडिलांना बाळाच्या पोटावर विळ्याने शंभर चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोरदा या अतिदुर्गम आदिवासी गावात हा घडला. एका मांत्रिकाच्या सांगण्यवरून आई-वडीलाने असे केले आहे. या प्रकारामुळे जिल्हात खळबळ उडाली आहे.
श्याम सज्जु तोटा असं या आठ महिन्यांच्या बाळाचं नाव आहे. आठ दिवसांपासून या बाळाला ताप, खोकला होता. आणि त्याचे पोट फुगत होते. अशा पोट फुगीला आदिवासी 'फोपसा' म्हणतात. पण या बाळाला दवाखान्यात न नेता आई-वडील 16 जून रोजी त्याला महिला मांत्रिकाकडे घेऊन गेले. आजारावर उपचार म्हणून तांत्रिकाने बाळाच्या पोटावर चटके देण्यास सांगितले. त्यानुसार आई-वडिलांना या ताहण्या बाळाच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिले.
हा प्रकार समोर आल्यानंतर काटकुंभ इथलं वैद्यकीय आधिका-यांचे भरारी पथक इथे पोहोचले. त्यांना बाळाला उपचारांसाठी चुरनी इथल्या ग्रामीण रुग्णालयात आणलं. सध्या त्या बालकावर उपचार सुरु आहेत. चिखलदरा पोलिसांनी मांत्रिक आणि बाळाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.