आशालता

1 min read

आशालता

मराठी व हिंदी पडद्यावरची सुस्वभावी आई व प्रेमळ सासूबाई रंगवणाऱ्या चरित्र अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं. ७९ वर्षीय आशालता यांना मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कोरोनाची बाधा झाली होती.

मराठी व हिंदी पडद्यावरची सुस्वभावी आई व प्रेमळ सासूबाई रंगवणाऱ्या चरित्र अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं. ७९ वर्षीय आशालता यांना मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कोरोनाची बाधा झाली होती.

आशालता यांनी मराठी रंगभूमी गाजवली तशी मराठी व हिंदी सिनेसृष्टीतही दर्जेदार अभिनय कौशल्याच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले. अगदी सुरुवातीला आशालता यांच्या गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, महानंदा व मत्स्यगंधा संगीत नाटकाने उदंड यश मिळवले. अनेक सिल्व्हर ज्युबिली व गोल्डन ज्युबिली सिनेमात आशालता यांनी सकस भूमिका साकारल्या असल्या तरी अंकूश, आहिस्ता आहिस्ता, उंबरठा, वो सात दिन, कमला की मौत, माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, सूत्रधार चित्रपटातल्या भूमिकासाठी त्यांना विशेष ओळखल्या जाते.

सध्या कंगनाच्या निमित्ताने अनेक वादविवाद सुरू आहेत आणि यात भाग घेताना अनेकांनी मराठी कलाकार आणि हिंदी कलाकारांमध्ये तुलना करताना मराठी कलाकारांना हिंदीत सन्मानजनक भूमिका किंवा योग्य सन्मान मिळत नाही असे नमूद करत हिंदीभाषिक कलाकार, निर्माते-दिग्दर्शक मंडळींवर टीकेची झोड उठवली जात आहे. अर्थात मराठीतल्या काही कलाकारांना हिंदीत जाताना आर्थिक लाभासाठी अशा भूमिका, ज्यात सन्मान नाही, अशा भूमिका कराव्या लागल्या असल्या तरी आशालता, विक्रम गोखले, नाना पाटेकर, मकरंद देशपांडे, स्मिता पाटील, मोहन आगाशे यांचा अगदीच विसर पडल्याचे जाणवते.
SAVE_20200922_145017
अलीकडचे मराठी कलाकार अदिती पोहनकर, गिरीश कुलकर्णी, राधिका आपटे, रितेश देशमुख, सयाजी शिंदे, सिनीयर सोनाली कुलकर्णी, शरद केळकर, निळू फुले यांच्यासारख्या भूमिकांत स्वाभिमान आणि आत्मसन्मान जपणाऱ्या मराठी कलाकारांचाही विसर पडलेला दिसतो. या कलाकारांमध्ये जयश्री गडकर, ललिता पवार, सुलोचना बाईंसह अव्वल स्थान आशालता यांचं आहे, हे इथं मी आवर्जून उल्लेखित करतो.
आशालता यांनी हिंदी सिनेमात कधीच धुणी-भांडी केल्याचे माझ्या तरी स्मरणात नाही. बरं, दुय्यम् दर्जाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण त्यासुद्धा अतिशय चांगल्या आणि मराठी माणसाला अभिमान वाटाव्या अशाच आहेत. एक विशेष म्हणजे, अलीकडील दोन-तीन दशकातल्या काही हिंदी सिनेमात सुलोचना बाईंनी काही भूमिका आई व सासूच्या भूमिका केल्यात. त्यात त्यांनी धुणी-भांडी केली आहेत. पटकथा व मागणीनुसार त्या भूमिका केल्या म्हणजे सन्मान नसणे असे तर होत नाही? मराठी सिनेमात का आई धुणी-भांडी करत नाही?

असो. आपण आशालता बाईंवर बोलतो आहोत, तर मग आशाबाईंच्या अंकूश, वोह सात दिन, आहिस्ता आहिस्ता मधल्या दर्जेदार व पूर्ण लांबीच्या भूमिकेकडे का दुर्लक्ष करतो? एखादा विषय माहिती न घेता बोलणे हा अलीकडचा रिवाज झाला आहे. मराठी कलाकारांवर हिंदीत अन्याय होतो, सन्मान मिळत नाही, या म्हणण्यात कसलेच तथ्य नाही हे अनेक स्वाभिमान जपणाऱ्या कलाकारांच्या भूमिकाच खुप काही सांगून जातात.

चार दोन सिनेमात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन किंवा आणखी कुणी नोकरांच्या भूमिका केल्या, त्यामागची कारणे वेगळी होती. आशालता किंवा सुलोचना बाईंचं तसं काही नाही, ही बाब लक्षात घ्यायला हवी. ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ जसं अगम्य असतं, तसंच कलाकारांचंही असतं. आशालता बाईंनी सकस अभिनयाच्या जोरावर हिंदीत वेगळे स्थान निर्माण केले आहे, ही बाब विसरता येत नाही. आईच्या भूमिका असो न्यायाधीश, करारी महिला असो की सोज्वळ पत्नीची भूमिका. आशालता बाईंनी आपला दर्जा आणि अभिनयातली उंची सिनेसृष्टीला दाखवून दिली आहे. एक चतुरस्त्र मराठी कलाकार म्हणून नेहमीच त्यांची नोंद घेतली जाईल...!