आठ दिवस सराफा बाजार राहणार बंद

1 min read

आठ दिवस सराफा बाजार राहणार बंद

सुवर्णकार असोसिएशनचा निर्णय

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच  पार्श्वभूमीवर यापूर्वी व्यापाऱ्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करीत शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याची मागणी केली होती. परंतु प्रशासनाने यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही. दरम्यान हिंगोली शहर सराफा व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने 2 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंगोली शहरात गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान व्यापारी महासंघाच्या वतीने काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन शहरात संचारबंदी लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु समाज माध्यमांवर या मागण्यांसंदर्भात उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. छोट्या व किरकोळ व्यापाऱ्यांनी अशा बंदला विरोध दर्शविला होता. दरम्यान विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता हिंगोली शहर सराफा असोसिएशनच्या वतीने दिनांक 2 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट यादरम्यान शहरातील सर्व सराफा सुवर्णकरांची दुकाने, गटई कामगार व सुवर्ण कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुधीर आप्पा सराफ यांनी दिली आहे.