बँकाच्या असुविधेविरुद्ध युवासेनेच्या वतीने आंदोलन

1 min read

बँकाच्या असुविधेविरुद्ध युवासेनेच्या वतीने आंदोलन

१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी या बँकेसमोर धरणे आंदोलन करणार, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे-रामेश्वर मोकाशे

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: वारंवार प्रशासनाने कागदी घोडे नाचवुनही बँका शेतकऱ्यांना कर्ज वितरण करत नाहीत. याविरुद्ध नेहमी प्रशासन कागदी घोडे नाचवुन शेतकऱ्यांची दिशाभूल करतेय का? असा सवाल उपस्थित करत युवासेनेच्या माध्यमातून बँकाच्या मनमानी कारभारामुळे वैतागून धरणे आंदोलन करण्याचा निर्धार युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी व्यक्त केला. या आशयाचे निवेदन त्यांनी सोनपेठचे तहसीलदार डाँ आशीषकुमार बिरादार यांना दिले आहे.

मागील अनेक दिवसांपासून शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कर्जमाफीत त्यांची फसगत झाली आहे. यात या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून पूर्वी कर्ज असणारा शेतकरी पात्र झाला. तशाप्रकारची माहिती पात्र शेतकऱ्याला मिळून सात महिने उलटले तरीही ही शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. यामुळे बँक कर्ज देत नाही, त्याचबरोबर सोनपेठ राष्ट्रीयकृत स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी दलालांमार्फत आलेली कर्ज प्रकरणे मार्गी लावतात, असा प्रकार सातत्याने सोनपेठच्या इंडिया बँकेच्या माध्यमातून चालू आहे.

शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकटे ओढावत असताना नियमाची पायमल्ली करत स्वतःचे नियम शेतकऱ्यांवर लादून शाखाधिकारी शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे टाळत असल्याचा प्रकारही समोर आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जाविना वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना कर्ज मिळवून त्यांना हातभार मिळणे गरजेचे आहे. मात्र शाखा अधिकाऱ्यांकडून कर्ज देताना टाळाटाळ होत आहे.
या निषेधार्थ १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी या बँकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मोकाशे यांनी निवेदनातून दिला आहे.