मोटाभाई बोले पवार चाले?

नारायण राणेंच्या प्रकरणात काँग्रेस, शिवसेनेचे अनेक नेते बोलत आहेत मात्र पवार नावाच्या कुटुंबाकडुन काहीही विधान आलं नाही. शरद पवारांनी मी या गोष्टीला महत्त्व देत नाही इतकंच विधान केलं आहे.

मोटाभाई बोले पवार चाले?

महाराष्ट्रः नारायण राणेंच्या प्रकरणावर आपण अजुनही चर्चा करतच आहोत. हे प्रकरण वाटतं तितकं साधं, सोपं नाही कारण त्याचे अनेक कंगोरे आहेत. ज्याप्रमाणे पत्ताकोबीच्या भाजीतला एक-एक पदर उघडत जातो आणि त्यात अणखी नवे पदर सापडतात तसंच या प्रकरणातही आहे. नारायण राणेंच्या प्रकरणात काँग्रेस, शिवसेनेचे अनेक नेते बोलत आहेत मात्र पवार नावाच्या कुटुंबाकडुन काहीही विधान आलं नाही. शरद पवारांनी मी या गोष्टीला महत्त्व देत नाही इतकंच विधान केलं आहे. अजित पवारांनी अक्षरही काढलं नाही. सगळ्याच प्रकरणावर बोलणा-या सुप्रिया सुळे या प्रकरणावर अगदीच शांत आहेत. राष्ट्रवादीचे लोक यावर काहीच बोलत नाहीत यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे.

शिवसेनेला या प्रकरणातला रस किती होता हे संपुर्ण जगाने पाहिलं आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परबांचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारीत झाला. एका वाहिनीने सोडलं तर इतर माध्यमांनी त्याला फारसं महत्त्व दिलं नाही. त्या व्हिडीओमध्ये अनिल परबांना अटक व्हावी यासाठीच्या सुचना परब देत होते. त्यावरुन शिवसेनेला या प्रकरणात प्रचंड रस होता हे सिद्ध झालं आणि यात कारवाई व्हावी यासाठी शिवसेना आग्रही होती. अगदी पोलिस फोर्सचा वापर करुन अटक करा अशा सुचना त्यांनी दिल्या होत्या. पोलिस यंत्रणा सरकारच्या दबावात होती हे यावरुन स्पष्ट होतं. आता अनिल परबांच्या या विधानानंतर शिवसेनेचा रस स्पष्ट झाला आणि पवारांच्या शांततेनंतर राष्ट्रवादीचा उद्धेश स्पष्ट होतो आहे.

खरंच महत्त्व द्यायाचं नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शांत होता का? तसं असतं तर गृहमंत्र्यांनी वेगळी भुमिका घेतली असती पण तसं घडलं नाही. गृहमंत्र्यांचा या सगळ्या प्रकरणात सहभाग होता. मग अटक व्हावी अशी इच्छा कोणाची होती? अटक होण्याचे फायदे, नुकसान कोणाचं होणार होतं? नारायण राणे यांना अटक केल्याने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल असं होणार नव्हतं कारण केंद्रीय गृहमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीसांनीही विधानाला विरोध केला असला तरी राणेंना पाठिंबा देऊ असं म्हटलं होतं. या प्रकरणामुळे नारायण राणे हे नाव उभ्या महाराष्ट्रात परसलं आहे, त्यांची प्रतिमा चर्चेत आली आहे, ते मराठा नेते आहेत, ते कोकणातले आहेत ही वस्तुस्थिती आहे. एका मराठा असणा-या कोकणी नेत्यावर मुंबईतल्या मराठा कोकणी मराठी माणसांवर कारवाई करुन जाणार आहे, ही वस्तुस्थिती आहे.

नारायण राणेंवरची ही कारवाई मुंबईच्या गणितावर मोठा फरक पाडणार आहे आणि हा फरक शिवसेनेसाठी धक्कादायक असणार आहे. मुंबईत शिवसेनेला धक्का म्हणजे याचा परिणाम आपल्या लक्षात येईल. ही पवारांची इच्छा होती का? शरद पवारांनी आजपर्यंत राजकारणाचा भाग म्हणून कितीतरी वेळा नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत. भाजपच्या नेत्यांना भेटण्याचा सपाटाच पवारांनी नारायण राणेंच्या अटकेपुर्वी लावला होता. पवार नक्कीच भाजपच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांपेक्षाही अधिक वेळा त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. याचा अर्थ काय होतो? पवारांच्या भेटीचं हे सुत्र अमित शहांच्या इशा-यावर चालू आहे का? देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांच पटत नाही असंही म्हटलं जातं त्यामुळे फडणवीसांना सत्तेपासुन दूर ठेवण्याचा अमित शहांचा निरोप होता का?

अजित पवारांनी अल्प काळासाठी फडणवीसांसोबत जे पहाटेचं नाटक केलं तेही अमित शहांच्या इशा-यावरुन झालं का? जेव्हा भाजपला गरज होती तेव्हा न मागता 2014 साली पवारांनी पाठिंबा दिला होता आणि शिवसेनेला सत्तेपासुन बाजुला ठेवलं होतं हे देखील पवारांच्या इच्छेवरुन झालं का? उद्या शिवसेनेची नाचक्की होणार आहे, त्यासाठी शरद पवारांना ही सुपारी दिली गेली आहे का? यासारखे अनेक प्रश्न आहेत. अमित शहांचे दुत म्हणून शरद पवार महाराष्ट्रात काम करत आहेत का? भेटी आणि घडलेल्या घटना याचा अभ्यास केला तर असा तर्क लावला जाऊ शकतो. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर आरोप झाले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला असं घडलेलं नाही. धनंजय मुंडेंवर आरोप झाले, अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला पण अटकेची कारवाई झाली नाही, छगन भुजबळ जामिनावर बाहेर आहेत, अजित पवारांच प्रकरण हे सगळं शांततेत चालू आहे.

मग परिणाम आणि कृती कोणावर होते आहे? संजय राठोडांना राजीनामा द्यावा लागला, मिलींद नार्वेकरांना घर पाडावं लागलं, आता अनिल परब अडचणीत आहेत हे तिघेही शिवसेेनेचे आहेत. शिवसेनेच्या नेत्यांची लफडी बाहेर येत आहेत, ते बदनाम होत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांची लफडी बाहेर आणण्याची गरज नाही ते आपोआप येतात पण त्यावर काहीच परिणाम होत नाही. या सगळ्याचा विचार केला तर शरद पवार हे अमित शहांचे दुत म्हणून काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या इशा-यावर शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करतो आहे का? हा प्रश्न निर्माण होतो. कारण नारायण राणे प्रकरणात ना राष्ट्रवादीने राणेंवर टिका केली, ना त्यांच्या विरोधातील एकही विधान केलं, ना राष्ट्रवादीच्या गटातुन शिवसेनेला पाठिंबा देण्याचं काम झालं. या सगळ्यावरुन तरी आम्ही म्हणतोय तसा तर्क लावण्यास संधी मिळते. हे खोटं असेल तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सिद्ध करायला हवं.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.