अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी.

1 min read

अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी.

अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलीस सुरक्षेला गुंगारा देत एका व्यक्तीने अर्णब गोस्वामी यांच्यापर्यंत मोबाईल पोहोचवल्याची माहिती समोर आली आहे.

रायगड: अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलीस सुरक्षेला गुंगारा देत एका व्यक्तीने अर्णब गोस्वामी  यांच्यापर्यंत मोबाईल पोहोचवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत अर्णब यांना भेटण्यासाठी त्यांचे वकील आणि घरचे लोक सातत्याने येत आहेत. यावेळी अर्णब यांच्यापर्यंत मोबाईल फोन पोहोचवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाकडून रितसर परवानगी घेऊन त्यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आल्याचे सांगितले जाते.

सूत्रांच्या माहितीनुसार, या मोबाईलवरुन अर्णब गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. सध्या पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी त्यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आल्याचे सांगितले जाते. काही वेळापूर्वीच पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन तळोजा कारागृहाच्या दिशेने रवाना झाले. कारागृह विभागाच्या पोलीस महानिरीक्षांकडून यासंदर्भातील आदेश काढण्यात आले होते. खारघर येथील तळोजा कारागृहात क्वारंटाईन सेंटरची सुविधा आहे. याठिकाणी अर्णब गोस्वामी यांना ठेवण्यात येईल. हा परिसर तुरुंग प्रशासनाच्या देखरेखीखाली असल्याने याठिकाणी बाहेरील कोणतीही व्यक्ती अर्णब यांच्यापर्यंत पोहचण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आता त्यांच्या  अडचणीत आणखी भर पडली आहे.

अलिबागवरून तळोजाच्या दिशेने रवाना होत असताना अर्णव गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. माझा जीव धोक्यात आहे. मला माझ्या वकिलांशी बोलून दिले जात नाही. मला आज सकाळी सहा वाजता उठविण्यात आले. पोलिसांनी मला धक्काबुक्की केली. त्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचे अर्णब गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.