औढा-नागनाथ भक्तांच्या कावड यात्रा रद्द

1 min read

औढा-नागनाथ भक्तांच्या कावड यात्रा रद्द

नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर भक्तांविना सामसूम

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व देवस्थाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी दरवर्षी श्रावण सोमवारी आठवे ज्योतिर्लिंग असणाऱ्या औंढा नागनाथ येथे दाखल होणाऱ्या भक्तांच्या कावड यात्रा रद्द झाल्या आहेत. तर मंदिर बंद असल्याने भक्तांविना परिसर देखील सामसूम असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यात असलेले आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ हे सुप्रसिद्ध आहे. दरवर्षी श्रावण सोमवार निमित्त जिल्ह्यासह विविध ठिकाणावरून येणाऱ्या भक्तांची संख्या प्रचंड मोठी असते. भक्तांच्या उपस्थितीवरच औंढा-नागनाथ गावचे अर्थकारण देखील अवलंबून आहे. परंतु यावर्षी मंदिर बंद असल्यामुळे भक्तांना दर्शनाकरिता येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दरवर्षी हिंगोली जिल्ह्यासह विविध ठिकाणावरून श्रावण सोमवार निमित्त भक्तांच्या कावड यात्रा दाखल होत असतात. यावर्षी मात्र नाईलाजाने भक्तांना आपल्या कावड यात्रा रद्द कराव्या लागल्या आहेत. तर दुसरीकडे श्रावण सोमवारी भक्तांच्या गर्दीने फुलून जाणारा मंदिर परिसर यावर्षी मात्र सामसूम असल्याचे दिसून येत आहे. यामुळे औंढा नागनाथ येथील अर्थकारणावर देखील मोठा परिणाम झाला आहे.