औरंगाबाद विमानतळ नाही आता ‘धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’

1 min read

औरंगाबाद विमानतळ नाही आता ‘धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’

औरंगबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण करण्यात आलं आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता औरंगाबाद विमानतळाचं नाव हे बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं झालं आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.

औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर केलं गेलं पाहिजे अशी मागणी शिवसेनेने गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगबादचा दौरा केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही कधीही तुम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाव बदलल्याची गुड न्यूज देऊ शकतात असं म्हटलं होतं. आता शहराचं नाही पण किमान विमानतळाचं नाव बदलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबाद विमानतळाचा उल्लेख छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असा यापुढे केला जाईल.

मुख्यमंत्री म्हणाले की, विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील “ धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ” असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल.

यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले आहे याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.