बैलांची चोरी करुन कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

1 min read

बैलांची चोरी करुन कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

११ आरोपी जेरबंद,गेल्या दहा महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यासह नांदेड, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये या टोळीने धुमाकूळ घातला होता.

प्रद्युम्न गिरिकर/ हिंगोली: शेतकऱ्यांचे बैल, गायी, कालवडी व गोऱ्ह्यांची चोरी करुन अर्ध्या किमतीत खाटकांना विक्री करत कत्तल करणाऱ्या १८ जणांच्या टोळीचा हिंगोलीच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक जगदिश भंडारवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पर्दाफाश केला असून ५ चोरटे व ६ खाटकांना जेरबंद केले आहेत. चोरीसाठी वापरात येणाऱ्या दोन मोटारसायकली व एक दहा चाकी ट्रक देखील पोलिसांनी जप्त केली आहे. गेल्या दहा महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यासह नांदेड, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये या टोळीने धुमाकूळ घातला होता. चार जिल्ह्यातील २५ च्यावर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गोवंशाची चोरी केल्याची कबुली अटकेतील आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बैलजोडी अथवा बैलाची चोरी होण्याचे प्रकार मागील दहा महिन्यापासुन सुरु होते. याप्रकरणी आखाडा बाळापुर, नर्सी नामदेव, हिंगोली ग्रामीण, बासंबा, हट्टा, वसमत ग्रामीण, कळमनुरी या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. मात्र, चोरटे हाती लागत नसल्यामुळे हिंगोलीच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक जगदिश भंडारवार यांनी पीएसआय शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करुन तपास सुरु केला होता. खबऱ्यांची माहिती व सायबर तंत्रज्ञानाचा वापर करत एलसीबीच्या पोलीस पथकाने नांदेड शहरात राहणाऱ्या सय्यद इब्राहिम उर्फ बाबा सय्यद सरवर, महोम्मद फिरोज उर्फ पिरु म. गौस, शेख शमी शेख मतीन, महोम्मद रियाज अब्दुल रौफ, सोहेल खान उर्फ सोनु, यावरखान पठाण या पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी १८ जणांच्या टोळीचा पर्दाफाश झाल्याचे पोलीस निरीक्षक भंडरवार यांनी सांगितले. तसेच बैलाची चोरी करुन नांदेडमधील खाटकांना विक्री केल्याची कबुलीही पोलिसांसमोर दिली. त्यावरुन चोरीचे बैल विकत घेऊन कत्तल करणारे नांदेडमधील महोम्मद फैय्याज म. इब्राहीम कुरेशी, महोम्मद फिरोज म. हुसेन कुरेशी, महोम्मद अहेमद हुसेन कुरेशी, महोम्मद नसीम म. सालार कुरेशी, अब्बास वहाब कुरेशी, महोम्मद अन्सार म. बाबु कुरेशी या सहा जणांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी अर्ध्या किंमतीत बैल विकत घेऊन मांस नांदेडच्या विविध भागात विक्री केल्याची कबुली दिली. तसेच या टोळीत नांदेडमधील शेख शफी उर्फ बिल्डर, शेख इम्रान शेख अहेमद, अब्दुल उमर अब्दुल शुबूर, शेख अमेर उर्फ अम्मु, शोएब उर्फ मामु, महोम्मद जावेद म. इस्माईल बागवान, अब्दुल जुबेर अब्दुल उस्मान हे सात जण देखील सहभागी असल्याचे समोर आले आहे. नांदेडमधील शेख शमी शे. मतीन रा. मोहमदीया कॉलनी याच्या मालकीचा एम.एच. ०४ ईएल ८७६० या क्रमांकाचा दहा टायरचा ट्रक बैल चोरीसाठी वापरणार जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या चोरट्यांनी बैलाची चोरी करुन कत्तल केल्यामुळे यातील आरोपींची संपत्ती जप्त करुन त्याचा लिलाव करत संबंधित शेतकऱ्यांना परतावा देण्याबाबत तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक जगदिश भंडारवार यांनी सांगितले. या चोरट्यांचा छडा लावणाऱ्या पथकामध्ये पीएसआय किशोर पोटे, शिवसांब घेवारे, अभय माखणे, हनुमंत नकाते, सुवर्णा वाळके, चालक पोलीस प्रशांत वाघमारे, तुषार ठाकरे, पोलीस कर्मचारी बालाजी बोके, विलास सोनवणे, शंकर जाधव, संभाजी लेकुळे, भगवान आडे, आशीष उंबरकर, विठ्ठल कोळेकर, विशाल घोळवे, राजुसिंग ठाकुर, किशोर कातकाडे, शंकर ठोंबरे, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, दिपक पाटील, आकाश टापरे, विठ्ठल काळे, सायबर सेलचे निलेश हलगे, जयप्रकाश झाडे, सुमित टाले, रोहित मुदिराज, रमा ठोके, रेशमा शेख, पारु कुडमेथे यांच्या पथकाचा समावेश होता.