आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत बांबूचा सहभाग- पाशा पटेल

1 min read

आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत बांबूचा सहभाग- पाशा पटेल

सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वात इंडिया बांबू फोरमची स्थापना.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत बांबू या पिकाचा मोठा सहभाग असणार आहे. बांबू नव्या भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे मत महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले. यासाठी माजी मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वात इंडिया बांबू फोरमची स्थापना करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या फोरमचा ऑनलाइन शुभारंभ नवी दिल्लीतून संपन्न झाला. त्यावेळी पाशा पटेल बोलत होते. माजी मंत्री सुरेश प्रभू, दिल्ली आयआयटीचे प्रा.डॉ.सुप्रतिक गुप्ता, महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही गिरिराज, मणिपाल युनिव्हर्सिटीचे संचालक मधुरा यादव, कॉनबॅकचे संस्थापक संचालक संजीव करपे, मुकेश गुलाटी आदींची यावेळी उपस्थिती होती.
या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये बोलताना पाशा पटेल यांनी सांगितले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता बांबू या विषयात पुढाकार घेतला आहे. त्याला नितीन गडकरी आणि आता सुरेश प्रभू यांची जोड मिळाली आहे. आत्मनिर्भर भारताची उभारणी करताना बांबूचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे. देशाच्या विकास चळवळीचा बांबू हा मानबिंदू ठरणार आहे. बांबू लागवडीमुळे जंगलतोड कमी होऊन पर्यावरण वाचवता येऊ शकते. बांबूच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे शक्य आहे. त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. यासाठी हा बांबू फोरम आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थांना जोडून तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान केले जाणार असल्याचे पाशा पटेल म्हणाले.
त्यांनी सांगितले की,या फोरम अंतर्गत बांबू क्षेत्राशी निगडित असणाऱ्या देशभरातील ५० व्यक्तींना संघटित करण्यात आले आहे. ही मंडळी बांबू क्षेत्राच्या विकासासाठी सामाजिक दायित्व म्हणून आपला वेळ खर्च करून हरित अर्थशास्त्रात मोलाची कामगिरी पार पडणार आहेत. देशातील बांबू क्षेत्रातील सर्व भागीदार व आंतरराष्ट्रीय संस्था यांच्यासोबत हा फोरम धोरणात्मक बदलासाठी काम करणार आहे.
पाशा पटेल म्हणाले की, मागील २० वर्षांपासून देशातील बांबू क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खऱ्या अर्थाने त्याला गती दिली. त्यांनी बांबूला झाड या व्याख्येतून गवत ही व्याख्या मिळवून दिली. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हेदेखील बांबू क्षेत्राच्या वाढीसाठी आग्रही आहेत.त्यांनी बांबूपासून इथेनॉल ,शेडनेट व फर्निचर तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये वनमंत्री असणारे सुधीर मुनगंटीवार यांनी बांबू संदर्भातील कामांना वेग दिला. चिचपल्ली (चंद्रपूर) येथे बांबू रिसर्च सेंटरची १०० कोटी रुपयांची बांबूपासून तयार केलेल्या इमारतीची उभारणी केली.आजपर्यंत या क्षेत्राची ताकद पूर्णपणे वापरता आली नाही. या क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांना क्रियाशील घटकांशी जोडले जाणार आहे.
वास्तुविशारद, अभियंता, निर्मितीकार, डिझायनर प्रशिक्षण संस्था ,संशोधन संस्था, वित्तीय संस्था, यंत्रसामुग्री निर्माते यांना परस्परांशी सोडून साखळी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
पाशा पटेल यांनी सांगितले की, बांबूवर आधारित राज्य व राष्ट्रीय पर्यावरणात्मक परिणामांना लक्ष करणे हा या फोरमचा उद्देश आहे. बांबू क्षेत्राचे ज्ञान देणारे पोर्टल निर्माण करणे, तांत्रिक मानांकन निश्चित करणे, उद्योजकांसाठी पाठीराखा म्हणून काम करणे तसेच उत्पादक व खरेदीदार यांच्यातील दुवा म्हणून हा फोरम काम करणार आहे.
त्यांनी सांगितले की ,आज पर्यावरण बदलत असताना बांबूमुळे वनक्षेत्र वाढू शकते.याशिवाय बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना उसापेक्षाही अधिक उत्पन्न मिळू शकते. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे हे पीक असून या माध्यमातून शंभर वर्षापर्यंत खात्रीशीर उत्पन्न मिळते, अशी माहितीही पाशा पटेल यांनी यावेळी बोलताना दिली.