बँक बदनामीचे षडयंत्र

1 min read

बँक बदनामीचे षडयंत्र

एक भक्कम आर्थिक संस्था उध्दवस्त करण्याचे प्रयत्न वैयक्तीक हेवेदावे आणि द्वेषातून घडत आहे. हजारो लोकांच्या जगण्याचा आधार असलेली बॅंक खोट्या आरोपांनी संपवली तर काळ या लोकांना माफ करणार नाही. वैद्यनाथ बँक भक्कम आहे आणि राहिल

पिंपळाचे पान अंगावर पडले की आभाळ पडल्याची हाकाटी पिटत पळणारा भित्रा ससा आपण गोष्टीमधून वाचला असेल. सगळ्या जंगलाला तो भित्रा ससा घाबरवून टाकतो. आणि जंगल उगीच आभाळ पडतेय या अफवेचा बळी ठरते. आता हा भित्रा ससा माणसांच्या जंगलात कावेबाज झाला आहे. त्याला समजलं आहे की अफवा सोडली की ती खरी समजणारे अनेकजण असतात. आणि ती अफवाच बातमीचे रूप घेऊन येते. याच गोष्टीचा फायदा घेत हे ससे आता एखादी संस्था उध्वस्त करण्यासाठी अफवा पसरवू लागले आहेत.
या अफवेचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर होऊ शकतो याची जाणिव असताना देखील हे केले जाते आहे.
देशभरातील बँकींग संशयाच्या वलयात असताना स्थानिक आणि सशक्त बँकाच्या बाबतीत अफवा पसरवत ती डबघाईला कशी येईल यासाठी डावपेच आखले जात आहेत.
आपण ही एक घटना तपासून बघूया..
bank-logo
वैद्यनाथ बँक (परळी ) अडचणीत असल्याची अशीच हाकाटी पिटण्यात आली. बँकेच्या संचालक, चेअरमन आणि अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही बातमी पसरवत वैद्यनाथ बँक अडचणीत असल्याची चर्चा सुरू जाणीवपूर्वक सुरू करण्यात आली आहे.
यातील कांही सत्य तपासून बघू..
कळंब तालुक्यातील शंभू महादेव शुगर अलाईड इंडस्ट्रीज या साखर कारखाण्याचे कर्ज साखर विक्री वादात आली आहे. मुळात कारखाण्याचे चेअरमन दिलीप आपेट हेच वादात अडकले आहेत. त्यांचे पतसंस्था प्रकरण सर्वांनाच ठाऊक आहे. यात वैद्यनाथ बँक अडचणीत अशी तब्बल ४४ कोटींचा फटका अशी चर्चा सुरू झाली. मुळात शंभू महादेव या साखर कारखाण्यास वित्त पुरवठा करणारी वैद्यनाथ ही एकटी बँक नाही. एकुण १८ बँकानी वित्तपुरवठा केला आहे. त्यात अग्रणी बँक (लीड बॅंक) म्हणून वैद्यनाथ बँक आहे.यात वैद्यनाथ बँकेचे कर्ज फक्त १ कोटी ५४ लाख रूपये आहे.

एकुण कर्जापोटी या साखर कारखाण्याची मालमत्ता बँकांकडे तारण आहे. आणि वैद्यानाथ ही अग्रणी बँक असल्याने ती वसुलीत अग्रहक्काची बँक देखील असणार आहे.
कारखाण्याची ६५ एकर जमीन, डिस्टिलरी प्लांट, कच्चा व पक्का मालाचा साठा, नोदणीकृतरित्या गहाण आहे. यात तयार साखर देखील आली. याच साखर विक्रीच्या प्रकरणाचा गाजावाजा केला जात आहे. बँकेला अडचणीत आणले जात आहे ते प्रकरण आधी समजून घेऊ मग पुढे सरकू.
दिलीप आपेट आणि संचालक मंडळानी बँकेच्या ताब्यात असलेली साखर परस्पर कुलूप तोडून विक्री केली.(याला सरळ सरळ चोरी म्हणता येईल.) याविरूध्द कळंब पोलीस ठाण्यात तक्रार देखील करण्यात आली. (१५ मार्च २०१८) मात्र त्यावेळी पोलीसांनी डीआरटी कोर्टात जाण्याबाबत सुचवले.
पुढे कारखाण्याने हा डीआरटी कोर्टाचा विषय नाही असे सांगत कळंब येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-याकडे प्रकरण दाखल केले. जे आजतागायत न्यायप्रविष्ट आहे.
साखर अपहाराबाबत खटला न्यायालयात प्रलंबीत असतानाच एक तक्रार कळंब पोलीसात दाखल होते. एक बॅंकेचा थकबाकीदार तक्रार दाखल करतो आणि पोलीसात लगेच दखल घेत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया देखील होते.हेसगळं सुत्रबध्द षडयंत्र आहे हे समजल्याशिवाय राहत नाही.
गंमत अशी की १५ मार्च २०१८ ला तक्रार होते आणि २० नोव्हेबर २०१८ रोजी वाटवाडा येथील डीडीएनएसएफएल लि. या कंपनीला कारखाणा विक्री करण्यात आला. यात ५५ कोटी ४ लाख रूपये मिळाले.
ज्या बँकानी कर्ज दिले होते. त्या सगळ्या कारखाण्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करून वसुलीबाबत विनंती केली होती. (क्रिमिनल अर्ज क्र ९६४-२२१९-२०१८) या खटल्यात बँकेने शपथपत्र देऊन विक्री पश्चात आलेल्या रकमेतून शेतक-यांची उस बिल अदा करण्याचे शपथपत्रात कबूल केले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार (३१ ऑक्टोबर २०१८ ) शंभू महादेव कारखाण्याची विक्री प्रक्रिया पार पाडण्यात आली. न्यायालयाने सुधारीत आदेश देत रक्कम उच्च न्यायालयात जमा करायला लावली आता ५५ कोटी ४ लाख रूपयातील उस बिलाची रक्कम जाऊन साधारण अंदाजे ४५ कोटी रूपये उच्च न्यायालयात जमा आहेत. जी न्यायालयीन प्रक्रियेनंतर न्यायालयाकडून बँकाना परत मिळणार आहेत. म्हणजे सध्याच्या स्थितीत बँकांचे पैसे उच्च न्यायालयात सुरक्षीत आहेत.
साखर अपहाराबाबत बँकेनेच खटला दाखल केला आहे. त्यानंतर येणा-या तक्रारी या बँक आणि संचालकांना अडचणीत आणण्यासाठीच आहेत हे स्पष्ट होते
एक चांगली चालत असलेली वित्तीय संस्था अडचणीत यावी यासाठीच हा अफवांचा बाजार केला जात आहे.