वसमत व्यापाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

1 min read

वसमत व्यापाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

दोन दिवसांचे वेळापत्रक जाहीर

प्रद्युम्न गिरिकर/ हिंगोली:जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी व्यापाऱ्यांच्या अँटीजन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. हिंगोली पाठोपाठ वसमतचे  उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सोमवार व मंगळवार या दिवशीचे  तपासणी वेळापत्रक जारी केले असून वसमत व परिसरातील व्यापाऱ्यांना  कोरोनाची  तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोना विषणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर 6 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांनी आपली विषाणू संसर्ग तपासणी करून घेण्याचे आवाहन केले होते. यानुसार जे व्यापारी तपासणी करणार नाही अशांना त्यांची दुकाने उघडता येणार नाहीत असा इशारा देखील देण्यात आला होता. हिंगोली उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी शनिवारी तपासणी शिबिरांचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्या पाठोपाठ वसमत उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सोमवारी व मंगळवारी होणाऱ्या तपासण्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सोमवारी वसमत शहर व परिसरातील सर्व दूध डेअरी चालक व त्यांचे कर्मचारी यांची तपासणी करण्यात येणार आहे. तर मंगळवारी सर्व कृषी सेवा केंद्र चालक व त्यांच्या कर्मचाऱ्यांची तपासणी सकाळी दहा वाजल्यापासून करण्यात येणार आहे. यानंतर इतर व्यापारी वर्गांच्या तपासणी शिबिराचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रवीण फुलारी यांनी सांगितले असून संबंधित व्यापाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहून नोंदणी करीत तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.