सावधान..! कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता.

1 min read

सावधान..! कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता.

कोरोना योद्ध्यांच्या मेहनतीमुळे जिल्ह्यात कारोना संसर्ग रोखण्यात यश मिळत आहे.

सुमित दंडुके/औरंगाबाद दि.३० : जगभरात डिसेंबर महिन्यात करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असून चीन, युरोपमध्ये पुन्हा लॉकडॉऊन जाहीर झालं आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन यंत्रणांनी सर्व प्रकारची तयारी ठेवावी, अशा सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या.
पालकमंत्र्यांनी गुरुवारी करोना उपाययोजनांचा आढावा घेतला. कोरोनातून बरे झालेल्यांसाठी प्राधान्याने आरोग्य सुविधांचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, करोना योद्ध्यांच्या मेहनतीमुळे जिल्ह्यात कारोना संसर्ग रोखण्यात यश मिळत आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९३.७२ टक्के असून मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी चाचण्याचे प्रमाण वाढवा, अशा सूचना दिल्या. पोस्ट कोविडअंतर्गत निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्याबाबत उपचार सुविधा उपलब्ध द्या, आदी सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी उपाययोजनांची माहिती दिली. रुग्ण बरे होण्याचा दर हा वाढत असून मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी वेळेत निदान करण्यावर लक्ष देण्यात येत असल्याचे सांगितले.